कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Sunday, October 30, 2011

दोन कलाप्रकारांचा संवाद...

- प्रभाकर कोलते

(कमलताई गेल्यानंतर १८ जून २०११ रोजी 'प्रहार'मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. तिथल्या नोंदीनुसार हा लेख त्याच वर्षी २० फेब्रुवारीला 'प्रहार'मध्येच प्रकाशित झाला होता. त्या फेब्रुवारीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने दहा लेखकांना सन्मानवृत्ती प्रदान केली होती, त्यात कमल देसाईंचा समावेश होता. त्यानिमित्तानं पहिल्यांदा हा लेख प्रसिद्ध झाला होता. या मजकुराचं सगळं श्रेय कोलते, प्रहार आणि संबंधित पानासाठी काम केलेल्या संपादकांना जातं. इथं केवळ कमलताईंबद्दलच्या गोष्टी एकत्र करण्याच्या हेतूनं हा लेख आहे.)

कमल देसाईंना मी पहिल्यांदा भेटलो सांगलीत. 'कलापुष्प'च्या कार्यक्रमाला गेलो असताना त्यांचं 'कलादृष्टी' या विषयावरलं भाषण ऐकलं. त्या वेळी त्या ७८ वर्षांच्या असतील... निर्भीडपणे, परखडपणे विचार मांडण्याची त्यांची ताकद आणि हिंमत इतकी आवडली की, त्यानंतर आमचा संवाद सुरू राहिला आहे. त्यांची उत्सुकता बालकासारखी, उत्साह तारुण्यासारखा... स्वभाव अत्यंत ऑन द ग्राउंड! दुसऱ्याचं कौतुक करणं - नव्या दृष्टिकोनांविषयी कुतूहल जागं ठेवणं हे त्यांच्या स्वभावातच आहे. त्यामुळे संवाद वाढतच जातो. त्यांच्या भाषणांतला किंवा लेखी भाषेतला प्रखरपणाही आतून जाणवतो. त्यांची बैठक क्रांतिकारकाची; पण भाषेत तिरस्कार वा तिखटपणा नाही. स्वतः बंदूक उचलून गोळी चालवावी, असं त्या बोलतील. टीकेचा रोख ज्याच्यावर असेल, त्याला लाजिरवाणं होईल अशी टीका त्या करतात. या परखडपणाच्या मुळाशी स्वच्छपणा आहे हेही लक्षात येतं. त्यांना 'आई' म्हणणारा मी, त्यांच्यातील अल्लड मूलही अनेकदा पाहू शकतो, असं त्यांचं व्यक्तिमत्त्व!

स्त्रीमुक्ती हा शब्द प्रचलित होण्याआधीच्या काळातही कमल देसाईंनी जे लिखाण केलं, ते स्त्रीमुक्तीशी सुसंगत होतं. अर्थात, त्यांचे जे विचार आहेत ते मुक्त मनुष्याचे विचारच आहेत. त्यात जेंडर बायस नाही, असंच मला वाटत आलं आहे. याचं उदाहरण म्हणजे अलीकडल्याच एका नियतकालिकातली त्यांची कथा. दोन स्त्रियांविषयीच्या या कथेत शारीरिक आकर्षणाचा भाग येतो तो, देहानं आणि मनानं एखाद्या स्त्रीच्या इतक्या जवळ जावंसं दुसऱ्या स्त्रीलाही वाटू शकतं आणि हे आकर्षण पूर्ण न झाल्यास तगमग होऊ शकते, इतपतच. लेस्बियन संबंधांचा भडकपणा त्यात अजिबात नाही.

आजदेखील किमान तीन कथा त्यांना लिहायच्या आहेत. 'आपण या ग्रहावर आहोत, पण मीच एलियन आहे का? याची कारणं काय?' असा यापैकी एका कथेचा आशय आहे. पण ती अद्याप लिहायला घेतलेली नाही. 'का?', असं परवा विचारलं तर म्हणाल्या, 'मी कोण लिहिणारी? ते आतून आलं पाहिजे. तोवर थांबलं पाहिजे. तो एलियन जर असेल ना, तर तोच लिहील!' या तीन कथाबीजांबद्दल एकदा, 'साहित्य हादेखील फॉर्म आहे. मी पन्नास वर्षांपूर्वी त्याचा विचार जसा करत होते तसा तो राहिलेला नाही', अशी जाण असणाऱ्या कमल देसाईंना वाटतं, 'साहित्य वाहत्या पाण्यासारखं असलं पाहिजे... सुरू कुठे झालं आणि संपलं कुठे हे कळू नये असं' आणि 'अरेच्च्या, हे मी लिहिलं का? असं संपल्यावर वाटलं पाहिजे', हा उत्स्फूर्तपणा, पारदर्शकपणा त्यांनी जपला आहे.

तरीदेखील त्यांच्यावर टीका करताना कथा हा महत्त्वाचा वाङ्मयप्रकार नाही, असे मुद्दे काढले जातात. त्यावर कमल देसाई यांची भूमिका साधी, पण स्पष्ट आहे : साहित्यकृती ती साहित्यकृतीच. त्यात प्रकार कशाला पाडायचे? साहित्यकृती चार ओळींची असेल नाहीतर सहासातशे पानांची, जेम्स जॉइसच्या 'युलिसिस'सारखी! 'युलिसिस'मधून जॉइस तुम्हाला स्वप्नात घेऊन जातो, आकाशात घेऊन जातो, परत जमिनीवर आदळतो, असं त्या परवा म्हणाल्या. सर्व कला एका व्यासपीठावरच ठेवल्या पाहिजेत, हा त्यांचा आग्रह सौंदर्यशास्त्राशी सुसंगत आहे. अनेक विषयांवरल्या या संवादात चित्रांचा विषय अनेकदा निघतोच. त्यांच्याकडे नेहमीच असलेलं कुतूहल आणि उत्सुकता ही निरागस अज्ञानातून आलेली ज्ञानाविषयीची ओढ आहे, हेही मला समजत गेलं. 'अॅबस्ट्रॅक्ट चित्रं मला आवडतात, पण त्यांना अॅबस्ट्रॅक्ट का म्हणायचं? रंग सिम्बॉलिक असतात का? तुम्ही चित्रं काढता तेव्हा शब्दांत विचार करता की नाही?' असे प्रश्न त्या आधी विचरात. पुढे, 'काहीतरी करतात चित्रं माझ्या आतमध्ये, पण ते काय आहे, हे मला जाणून घ्यायचंय', असं त्या म्हणू लागल्या आणि आता म्हणतात, 'चित्रं ही पाहायची असतात आणि अनुभवायची असतात. त्यातून अर्थ तुम्हाला सापडला तर तुमचं भाग्य!'

दुर्गा भागवत पुरस्कार मला मिळाला, त्या सोहळ्यात कमलताई प्रमुख पाहुण्या होत्या. 'चित्रकलेबद्दल मी काय बोलणार?' अशी सुरुवात करून माझ्या पुस्तकातल्या (कलेपासून कलेकडे) पळशीकरांविषयीच्या लेखाचा उल्लेख त्यांनी केला आणि पळशीकरांचं 'ई= एमसीस्क्वेअर' हे चित्र स्वतःला कसं भिडलं, हे सांगताना त्यातल्या लाल स्ट्रोक्सचा उल्लेख 'अग्निफुलं' असा करून कमलताईंनी सर्वच उपस्थितांपर्यंत त्या चित्रातलं ऊर्जासूक्त नेमकं पोहोचवलं! हल्लीच पुण्याला गेलो असता त्या म्हणाल्या, 'शिकवायचे त्यावेळी तुमची चित्रं पाहिली असती, तर शिकवण्यात फरक पडला असता माझ्या' - दुसऱ्या कलाप्रकाराचं मूल्य समजून घेतलं जातं आहे, याचा आनंद मला - माझ्या कौतुकापेक्षा- अधिक झाला होता! कलाप्रकारांचा संवाद होणं आणि सुरू राहणं शक्य आहे, याचा हा आनंद आहे.

No comments:

Post a Comment