कमल देसाई (१० नोव्हेंबर १९२८ - १७ जून २०११)

Tuesday, November 8, 2011

बातमी

कमल देसाई १७ जून २०११ रोजी गेल्या. तेव्हा 'ई-सकाळ'वर प्रसिद्ध झालेली ही बातमी.  फक्त संदर्भासाठीच--
(निधनाच्या बातमीचा संदर्भच सुरुवातीला काहींना कदाचित पटणार नाही, पण काय करणार?)

----------
प्रयोगशील लेखिका कमल देसाई यांचे निधन

सांगली- आपल्या प्रयोगशील लिखाणाने मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केलेल्या लेखिका कमल देसाई यांचे आज (शुक्रवारी) सकाळी नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. मेंदूज्वरामुळे त्या आजारी होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

साहित्य, चित्रकला, सांस्कृतिक क्षेत्रांतील नव्या पिढीशी त्यांचा सतत संवाद असे. त्यांचा सार्वजनिक वावर शेवटपर्यंत कायम होता. गेल्या गुरुवारी सांगलीत 'न्यू प्राईड मल्टीप्लेक्‍स'मध्ये त्यांनी मित्रांसोबत 'बालगंधर्व' चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी गांधर्वयुगावर दिलखुलास चर्चा केली होती.

आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार असल्याचे निकटवर्तियांनी सांगितले.

कमलताईंचा जन्म कर्नाटकातील यमकनमर्डी गावात १० नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. प्राथमिक माध्यमिक शिक्षण धारवाडमध्ये झाले. इंग्रजी भाषा आणि साहित्यावरील अलोट प्रेम होते. तरीही त्यांनी मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून एमए केले. पदवीनंतर त्यांनी अहमदाबाद, धुळे, भिवंडी, मिरज, कागल येथे दीर्घ काळ मराठीचे अध्यापन केले. सौंदर्यशास्त्र आणि मराठी साहित्य हे त्यांचे आवडीचे विषय होते.

साठ-सत्तरच्या दशकांमध्ये 'सत्यकथा' मासिकामधून पुढे आलेल्या आधुनिक जाणिवेच्या लेखक-लेखिकांमध्ये कमल देसाईंची गणना होते. प्रतिके आणि प्रतिमांची अर्थवाही लेखनशैली त्यांचे वेगळेपण दाखवणारी ठरली.पॉप्युलर प्रकाशनाने कमलताईंचा 'रंग-१' हा कथासंग्रह १९६२ मध्ये प्रकाशित केला. या कथासंग्रहातील 'तिळा बंद' कथेने इतिहास निर्माण केला. आशिया खंडातील स्त्रीवादी साहित्यातून निवडलेली ही कथा अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलीनॉय इथे अभ्यासक्रमासाठी लावली. त्यानंतरच्या विविध नियतकालिकांतील त्यांच्या कथा 'रंग २' नावाने प्रसिध्द झाल्या. 'रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग' ही कादंबरी, 'काळा सूर्य' व 'हॅट घालणारी बाई' या दोन लघुकादंबऱ्या प्रसिध्द झाल्या. गेल्या वर्षी सुमित्रा भावे यांच्या 'एक कप च्या' या चित्रपटातही त्यांनी काम केले. वंदना शिवा यांच्या 'स्टोलन हार्वेस्ट' या ग्रंथाचे 'लुबाडलेले शेत' नावाने तर बर्नर्ड बोंझाकिट यांच्या 'थ्री लेक्‍चर्स ऑन ऍस्थेटिक्स' या पुस्तकाचा 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने' या नावाने अनुवाद केला.

मजकूर

कमल देसाईंच्या निधनानंतर 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये  १८ जून २०११ रोजी प्रसिद्ध झालेला मजकूर-

कमल देसाई यांच्या निधनाने मराठी साहित्यातील एका फॅण्टसीलाच पूर्णविराम मिळाला आहे. 'रंग-१' आणि 'रंग-२' हे दोन कथासंग्रह, 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही कादंबरी आणि 'काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई' ही जोड कादंबरी एवढंच मोजकं लिहूनही कमल देसाई मराठी साहित्याच्या विश्वात अजरामर झाल्या. विशेषत: 'काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई' प्रसिद्ध झाल्यावर कमल देसाई साहित्यातील फॅण्टसीची एक जितीजागती मिसाल बनल्या. स्त्रियांकडे कल्पकतेचा अभाव असतो, असा आरोप लेखिकांवर कायम केला जातो. पण कमल देसाई आणि त्यांचं साहित्य म्हणजे या आरोपाला एक सणसणीत उत्तर आहे. मात्र केवळ त्यांचं साहित्यच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वही एखाद्या फॅण्टसीसारखं होतं. त्यांच्या आयुष्याचा आलेख पाहिला की, त्याचं पुरेपूर प्रत्यंतर येतं. त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डीचा. मिरजेत त्यांचं वडिलोपार्जित घर होतं आणि त्यांचं बालपण व सुरुवातीचं शिक्षणही तिथेच झालं. पुढे एम.ए.च्या शिक्षणासाठी त्या मुंबईत होत्या. एम.ए.ला असतानाच त्यांनी कथालेखनाला सुरुवात केली आणि त्यांच्या कथा 'सत्यकथे'त छापून यायला लागल्या. शिक्षण पूर्ण केल्यावर अहमदाबाद, धुळे, निपाणी, भिवंडी, कागल अशा अनेक ठिकाणी त्यांनी मराठीचं अध्यापन केलं, पण त्या कुठेच स्थिर झाल्या नाहीत आणि याचं मूळ त्यांच्या मनस्वी स्वभावात होतं. क्षणात शांत, क्षणात अशांत असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. पण यातून त्यांचं सर्जनशील लेखन मात्र झालं. वाचकांशी-समाजाशी फार संपर्क नसल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व साऱ्यांसाठी नेहमीच काहीसं गूढ होतं. मात्र लोकांत मिसळल्या नाही, तरी बौध्दिक-वैचारिक पातळीवर त्यांचा सतत अनेकांशी संवाद सुरू असायचा. यातूनच दुर्गा भागवत, अशोक शहाणे, 'नवी क्षितिजे'कार विश्वास पाटील, जया दडकर, समीक्षक रा. भा. पाटणकर अशांशी त्यांची मैत्री जमली होती आणि या सगळ्यांशी त्यांच्या साहित्यशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवाद, मिथक या विषयांसंदर्भात गप्पा होत. या गप्पांतून मिळालेल्या प्रेरणांतूनच त्यांनी बर्नर्ड बोझांकिटच्या 'थ्री लेक्चर्स ऑन एस्थेटिक' या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला होता. अलीकडेच प्रकाशित झालेल्या किरण नगरकर यांच्या 'द ककल्ड' (मराठी अनुवाद-प्रतिस्पर्धी) या कादंबरीला त्यांनी लिहिलेली प्रस्तावनाही त्यांच्या विचक्षण बुद्धिमत्तेची साक्ष देण्यास पुरेशी होती. त्याचप्रमाणे प्रसिद्ध चित्रकार पॉल गोगॅच्या 'ओल्ड गोल्ड ऑन देअर बॉडी' या पुस्तकाच्या प्रभाकर कोलते यांनी केलेल्या अनुवादालाही त्यांनी नुकतीच प्रस्तावना दिली होती आणि ती प्रस्तावनाही त्यांना एकूणच कलेविषयी असलेली जाण अधोरेखित करणारी आहे.

Monday, November 7, 2011

मिसफिट

- अशोक शहाणे

(कमलताई गेल्यानंतर 'प्रहार'च्या १८ जून २०११च्या अंकात प्रसिद्ध झालेला मजकूर. मजकुराचं सगळं श्रेय शहाणे, प्रहार, या पानासाठी काम केलेले संपादक इत्यादींना आहे. लेख इथं प्रसिद्ध करण्यासाठी शहाण्यांची परवानगी घेतली आहे. 'प्रहार' शब्दावर क्लिक केल्यावर मूळ पान पाहाता येईल. मूळ प्रसिद्ध झालेल्या मजकुरात तपशिलांच्या दोन चुका होत्या त्या इथं दुरुस्त केल्या आहेत.)

कमल देसाई यांचं खरं तर दुर्दैव असं की, त्यांचं लिखाण समजून घेऊ शकणारे वाचक त्यांना कधीच मिळाले नाहीत. ही त्यांची लेखक म्हणून खंत होती. पण या गोष्टीला इलाज नव्हता. हे नेहमीच असतं. आपण काय लिहितो, ते समजून घेणारा वाचक असेल का, याचा उपाय लेखकाकडे असत नाही. म्हणून ते आपलं समजणारा वाचक कधीतरी निघेल, या भरवशावर लिहीत राहतात. यामुळेच कमल देसाई बऱ्याच दिवसांपासून काही लिहीत नव्हत्या.
आपल्याकडे संवादाचाही मोठा प्रश्न असतो. बाई विद्यापीठात शिकवायच्या. पण तिथेही त्यांना असा अनुभव आला की, आपण जे सांगतो आहोत ते लोकांना ऐकायचंच नाही. मग वेळ घालवून, शिरा ताणून कशाला घ्या. म्हणून त्यांनी विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. सांगायचं म्हणजे बाई कशातच बसत नव्हत्या. जिकडे जावं तिकडे आपण मिसफिट आहोत, याची त्यांना कधीकधी खंत वाटायची. लिहिणं सोडा, पण उपजीविकेच्या बाबतीत असं व्हायला लागलं तर काय? त्यामुळे बाई अलीकडे हल्लक झाल्या होत्या. मध्यंतरी त्या काही काळ पुण्यात राहात होत्या. पण ज्यांच्याशी बोलावं अशी माणसं पुण्यात नव्हती. त्यातच त्यांची बालमैत्रीण सुधा (नावकल) मागच्याच वर्षी गेली. त्यानंतर त्या एकटय़ा पडल्या.
मी पुण्यात जायचो तेव्हा त्यांना नेहमी भेटायला जायचो. दोन-तीन महिन्यांपूर्वी गेलो होतो, तेव्हाही त्यांना भेटलो. पण त्या वेळी त्यांच्या भाचेसुनेनं सांगितलं की, 'तुम्ही आता जा. कारण तुम्ही आलात की, त्या बोलायला लागतात आणि मग नंतर त्यांना त्रास होतो.' त्यानंतर मात्र त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही. माझ्याविषयी त्यांनी काही वर्षापूर्वी एक लेख लिहिला होता, तो 'ऑफ द कफ' होता. आमचे संबंध एकमेकांविषयी लेख लिहिण्यापुरते कधीच नव्हते.
दहा वर्षापूर्वी बाईंच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांचा सांगलीत सत्कार करण्यात आला. मुंबईहून मी आणि रघू दंडवते त्याला गेलो होतो. तिथे बरेच लोक त्यांच्याबद्दल काय काय बोलले. मग त्यांना बोलण्याचा आग्रह करण्यात आला, तर त्या म्हणाल्या, 'मला काहीच बोलायचं नाही. तुम्ही बोललात तेच फार झालं.' पण त्यामुळे आयोजक नाराज झाले. त्यांनी बाईंनी बोलावं म्हणून पुन्हा आग्रह केला. तेव्हा त्या म्हणाल्या, 'माझे दोन मित्र मुंबईहून आले आहेत. त्यामुळे मला न बोलण्याचं बळ मिळालं आहे.' त्यांच्या अशा वागण्यानं सगळ्यांचा विरस झाला. पण मला आश्चर्य वाटतं होतं की, त्यांनी हा समारंभ होऊच कसा दिला? त्यावर त्या म्हणाल्या, 'समारंभ झाला काय अन् न झाला काय, त्यानं काही फरक पडत नाही. शिवाय 'नाही' म्हटलं की त्यासाठी जोर लावावा लागतो. त्यापेक्षा करतात तर करू द्या.' म्हणजे बाई म्हटलं तर त्यात होत्या, म्हटलं तर नव्हत्या.
बाई तसं गंमतीशीर प्रकरण होतं. अशी माणसं क्वचितच असतात. ती मुद्दामून शोधावी लागतात. आणि असली तरी आपली आणि त्यांची गाठ पडत नाही. अशी माणसं आता एकेक करून चालली आहेत. पण त्यांची जागा घेणारं कुणी दिसत नाही.

Sunday, November 6, 2011

कमल देसाई

कमलताईंना 'साधना पुरस्कार' जाहीर झाल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये १ ऑक्टोबर २००४ रोजी प्रकाशित झालेला मजकूर -


बख्खळ पुरस्कारांच्या आजच्या जमान्यातही काही पुरस्कार आपला मान राखून असतात आणि काही काही पुरस्कारविजेते असेही असतात की , ज्यांना तो पुरस्कार मिळाल्याने त्या पुरस्काराचाच सन्मान होत असतो!

चोखंदळ साहित्यिका कमल देसाई यांना 'साधना पुरस्कार' जाहीर झाल्याचे ऐकल्यावर त्यांच्या चाहत्यांची हीच भावना झाली; कारण, मोजकेच पण जीवनाचा वेगळाच अर्थ जाणवून देणारे प्रत्ययकारी लेखन करणारी लेखिका म्हणून या ७६ वर्षांच्या लेखिकेने मराठी सारस्वतात स्वत:चे असे एक खास स्थान निर्माण केले आहे.

१० नोव्हेंबर १९२८ रोजी बेळगावजवळच्या यमकनमडी गावी जन्मलेल्या कमल देसाईंनी उभारीची वर्षे अहमदाबाद. धुळे , निपाणी , कागल आदी ठिकठिकाणी मराठीचे अध्यापन करण्यात घालवली. त्यामुळे सत्यकथा , मौज आदी दर्जेदार नियतकालिकांतून मोजकेच लेखन करण्याकडे त्यांचा कल होता.

१९६२ साली ' रंग-एक ' हा त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर ' रंग- २' निघायला १९९८ साल उजाडावे लागले , इतका त्यांचा कथालेखनाचा वेग धीमा होता. दरम्यान १९६४ साली ' रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग' ही कादंबरी प्रकाशित झाली होती. नंतर 'काळा सूर्य' व 'हॅट घालणारी बाई' या दोन लघुकादंबऱ्या प्रकाशित झाल्या. १९८३ साली 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने' हे अनुवादाचे पुस्तक प्रकाशित झाले.

बस्स! एवढेच साहित्य नावावर असतानाही, डॉ. रा. भा. पाटणकर यांच्यासारख्या मर्मग्राही समीक्षकाला १९९४ साली 'कमल देसाई यांचे कथाविश्व' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित करून कमल देसाईंच्या कथालेखनाच्या बलस्थानांचा धांडोळा घ्यावासा वाटला, हे विशेष! कमल देसाई यांचा ' रंग-दोन ' हा कथासंग्रह लेखिकेला अभिप्रेत असलेले सामाजिक, राजकीय भाष्य अधिक नेमकेपणी अधोरेखित करणारा आहे. त्यांचे साहित्य या जगाचे व त्यातील अनेक पातळ्यांवरील अनाकलनीय मानवी व्यवहारांचे ताणतणाव; सभोवतालचे वास्तव व अंतर्मन यांत अविरत सुरू असलेले द्वंद्व; मानवी जगात मोठ्या प्रमाणात आढळणारी हिंसा व वेदना- या साऱ्याचे आगळेवेगळे आकलन वाचकांना घडवते. संज्ञाप्रवाही लेखनशैलीमुळे बाह्य वास्तवाच्या चित्रणापेक्षा , त्या वास्तवाच्या अनेकपदरी प्रतिक्रिया उमटवणारे मनोविश्लेषणात्मक लेखन त्यांच्या साहित्याला एक वेगळीच उंची व सघन पोत देऊन जाते. गोष्ट सांगणे, कथाभाग पुढे सरकावणे, पात्रे/प्रसंग/वातावरणनिर्मिती इत्यादी घटकतत्त्वांना कमल देसाईंमधील कथाकार/ कादंबरीकाराने ताकदीने नवी परिमाणे दिली. वाट्याला आलेले बरेवाईट आयुष्य जगत असताना माणसांना क्षणोक्षणी पडणारे नैतिक/मनोवैज्ञानिक/ आदिभौतिक प्रश्न ही साहित्यिका आपल्या कसदार साहित्यातून समर्थपणे हाताळते. त्यामुळेच त्यांचे लेखन एक वेगळीच उंची गाठते. कमल देसाई यांचे हार्दिक अभिनंदन!

Saturday, November 5, 2011

'एक कप च्या'मध्ये

'एक कप च्या' ह्या सुमित्रा भावे नि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात कमल देसाई (मागच्या बाजूला)

Friday, November 4, 2011

एक सदेह फॅण्टसी

- दुर्गा भागवत

कमल देसाईला मी 'कमळी' म्हणते. माझी म्हटलेली जी काही मोजकी माणसं आहेत त्यात कमळी येते. या माणसांशी बहीण-भाऊ, मुलगा-मुलगी असे कुठलेही संबंध मी प्रस्थापित केलेले नाहीत. साधी कौटुंबिक नातीच सांभाळत सांभाळता नाकीनऊ येतात माणसाच्या, तिथे बनावटीची नाती कुठे जोडायला जा? पण विशेष असा की, ही एकच वल्ली अशी आहे की मी तिला मेले, कार्टे, गधडी, शिंची अशा शेलक्या विशेषणांनी कुठेही, कुणापुढेही संबोधते. तीदेखील ती सारी बिरुदे खुशीत येऊन स्वीकारते. असा हा आमचा ऋणानुबंध.

कमळीला मी 'सदेह फॅण्टसी' म्हणते, ('फॅण्टसी'चे मराठी रूपांतर मी 'भ्रान्तिका' असे केले आहे) साध्या गोष्टी - पण पुढे कथा आणि नवकथा या नावाने प्रसिद्ध झालेला प्रकार - लिहिणारी कमळी पुढे अक्षरश: भ्रान्तिका लिहिता लिहिता स्वत:च फॅण्टसी कशी बनून गेली याचा हा आलेख आहे.

'सत्यकथे'त १९४९ साली तिची 'बाई सर्व्या घंटा झाल्या' ही कथा मी वाचली. तेव्हा ती इतर कथांसारखी असली तरी ताजी कथा होती. मला ती फार आवडली, नव्हे तिने माझ्या मनात घर केले. त्याला वर्ष उलटले. १९५० साली मी कशासाठी तरी गावदेवीला लॅबर्नम रोडवरच्या आर्य-महिला समाजाच्या लेडीज हॉस्टेलवर गेले होते. तिथे एम. ए. करीत असलेल्या तीन पोरी मला भेटल्या. हे त्रिकूट इंदू खाड्ये, सुधा कुलकर्णी (नंतर नावकल) आणि कमल देसाई यांचे. हे त्रिदल तेव्हापासून माझ्या नजीकच्या जगात वावरते आहे. कमल देसाई हे नाव ऐकल्यावर मी विचारले, 'बाई सर्व्या घंटा' ही गोष्ट तूच लिहिलीस का? ती हो म्हणाली आणि या तिघींशी माझी गट्टी जमली. इंदू अविवाहित असून बरीच वर्षं रिझर्व्ह बँकेत संशोधन विभागात काम करून निवृत्त होऊन पुण्याला गेली. सुधा लग्न करून नावकल बनली. नावकल कुटुंबाशी माझा अतूट स्नेह निरंतर आहे. तसाच स्नेह समस्त देसाई परिवाराशी आहे. कमळीबाई सर्व्या ढंगाच्या नि तरीसुद्धा थोडा सूर पालटणाऱ्या कथा लिहितच राहिली. त्या कथांचा संग्रह 'रंग' या नावाने 'पॉप्युलर'ने १९६७ साली प्रसिद्ध केला.

'रंग'नंतर तिच्या कथा फॅण्टसीच्या अंगाने आकार घेऊ लागल्या. तिची 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' ही पहिली कादंबरी १९६४मध्ये प्रसिद्ध झाली. 'रंग' ते 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' हा तिच्या लेखनाचा सुटा व प्रारंभिक टप्पा आहे. 'रंग'मध्ये 'बाई सर्व्या...' ही कथा आहेच. 'बाई सर्व्या घंटा झाल्या' या कथेत लेखिकेने जणू आपल्या आयुष्यभरच्या अस्थिर व्यावसायिक जीवनाची-भविष्यातली कुंडलीच मांडली आहे. कमळीच्या किती नोकऱ्या झाल्या नि ती कुठेच स्थायिक झाली नाही. उत्तम शिक्षिका, शीलवती आणि वक्तृत्वसंपन्न असून हे कसे हे साऱ्यांनाच एक कोडे पडते. विशेष करून माझे जीवनही तसेच अस्थिर असून मीही त्याबद्दल अचंबा करीत राहते.

१९६४नंतर कमळी सतत लिहितच राहिली ती थेट १९८८पर्यंत. पण या काळी तिची वाङ्मयीन घडण बदलली. साफ बदलली. तिच्या 'सत्यकथे'च्या दिवाळी अंकातल्या दोन कादंबऱ्या (की कथा?) 'काळा सूर्य' आणि 'हॅट घालणारी बाई' या १९७५ साली मौज प्रकाशनाने काढल्या. एकाच 'पुस्तका'त काढल्या. त्याची दुसरी आवृत्ती अजून निघाली नाही. कमळीतल्या फॅण्टसीने इथून आपला स्वत:चा आकार घेतला. त्या कादंबऱ्याही छोट्याच आहेत. या कादंबऱ्यांनी साहित्यिकांच्या श्रेष्ठ श्रेणीत तिला नेऊन बसवले. ध्रुवासारखे अढळ स्थान तिला प्राप्त करून दिले. कमळीसारखी फॅण्टसी मराठीत अजून कुणाला जमलेली नाही. कमळी फॅण्टसीत का शिरली? नियतीचे क्रूर प्राबल्य, मानवाचा पराभव यांच्या तीव्र जाणिवेने भरलेला आहे. तिची मानवी व्यवहाराची निरीक्षणे खोल व सुजाण आहेत आणि ती व्यक्त करण्याची तिची पद्धत पण अप्रूप आहे. हे कमळीकडे कसे आले?

कमळीच्या आयुष्यातले स्थूल तपशील मला माहीत आहेत. माझ्या मते हे वाङ्मयीन परिवर्तन घडवून आणणारा प्रसंग म्हणजे तिच्यापेक्षा थोरली अशी तिची सुविद्य आणि अतिशय कुशल, बुद्धिमान बहीण शांती हिचा १९७० साली घडलेला मृत्यू असावा. तेव्हापासून नियतीच्या क्रौर्याचे भान तिच्यात सतत चाळवत असल्याचे मला आढळले आहे. दुसऱ्याही अनेक प्रसंगांतून-तेही माणसा-माणसांतल्या प्रथम सलगीनंतर कायम दुरावा अशा प्रसंगातून उद्भवलेले. हे अनुभव साऱ्यांनाच कमी-अधिक प्रसंगात येतात. पण दुसरी माणसे सुखाचा शोध घेतात, लौकिक महत्त्वाकांक्षेचा मागे लागतात नि जगाच्या दृष्टीने 'सुखी' होतात तसे कमळीचे नाही. सुख म्हणजे काय हे तिला नीट कळते. दुसऱ्याच्या सुखाने ती खरोखर सुखावते. पण लगेच हा मूड बदलतो. ती परत स्वत:च्या आत स्वत:ला दडवते. बालपणी प्रत्येक बालकाच्या मनात असलेल्या भयाचा बागुलबोवा कमळीने फॅण्टसीच्या अतुलनीय शक्तीने आपला कायम सोबती केला आहे. बाकीचे तुम्ही आम्ही सारे औट घटकेपुरते तिचे सोबती असतो. तिचे सारे वागणेच 'विचित्र' असते. स्वत:बद्दल शंकित ती आम्हा साऱ्यांच्या सोबतीत असते, तेव्हा ती कुठेतरी किंचित विश्रब्ध पण असते. तिचे वागणे समोर असताना आनंदी दिसते न दिसते तोच ती 'आत' बुडते. 'आत बुडण्याची' तिची कला अजब आहे. इतकी की, ती कुठे गडप झालीय हे बघण्यासाठी बापू देसाई तिच्या बिऱ्हाडी येतात, तर कमळी अंधार करून स्वत:च्या एका खोलीच्या घरात पलंगावर उशी डोकीवर घेऊन पडलेली असते. हा तिचा शिरस्ता साऱ्यांनाच माहीत आहे.

'काळा सूर्य' आणि 'हॅट घालणारी बाई' यांच्यावर आमचे जया दडकर इतके खूश आहेत की, विचारू नका. ते म्हणतात, 'मराठीतले खरे कथाकार तीनच. जी. ए., कमल देसाई आणि चि. त्र्यं. खानोलकर. भलतीच ताकदीची बाई.' अशोक शहाणे तिच्या कथांना 'विक्षिप्त कथा' असे मोठ्या अभिमानाने म्हणतो.

आता याच दोन कथांच्या संदर्भात मला दिसलेले मानसचित्र असे - एक पॅरॉनॉइड म्हणजे स्थिरभ्रम वृत्तीचे दर्शन. दोन्ही कथांत - कादंबऱ्यांत मुख्य पात्र स्त्रीच आहे हे विशेष. पॅरॉनॉइड वृत्तीची ती नायिका सबंध गावात नाशाला कारणीभूत झालेले सुंदर शिल्पाकृती असलेलं काळ्या सूर्याचे मंदिर स्फोट करून त्यात आपला बळी देते. हॅट घातलेली बाईदेखील स्टुडिओला आग लावते. या दोन्ही कथांतले चित्रण मॅसोचिस्ट आत्मपीडक वृत्तीने अतोनात भरलेले आहे. शिवाय कमळीतदेखील ही वृत्ती अशी दिसते की, तिला जर कुणी त्रास दिला नाही तर बरेच वाटत नाही. नातेवाईकांची दारुण दु:खे त्यांच्याहून अधिक सोसण्यात तिला 'सुख' वाटते हे मीही पाहिले आहे. ती दु:खे खरेच दारुण आहेत यात शंका नाही. पण सामान्य माणूस त्यांच्यातून मनाने तरी सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतो, तर कमळी त्यांना गच्च कवळून धरते. तरी कमळी ही व्यक्ती म्हणून साऱ्यांनाच आवडते.

कमला दास आणि अमृता प्रीतमपेक्षा कमळी कितीतरी सरस आहे. कमळीचे लेखन कुणाच्या लेखनाबरहुकूम बेतलेले नाही. पाश्चात्य वाङ्मयाची जाण असून त्याचा आधार तिने घेतलेला नाही.

Thursday, November 3, 2011

कमलताई


- अनिल अवचट

कमल देसाई
परवा मोबाइल वाजला आणि नाव बघतो, तर काय? कमळी? म्हणजे? कमळी जिवंत आहे की काय? जगाला असा गुंगारा दिला होय?
पण फोनवर होती कमलताईंची सून. नंदू. कमलताईंच्या मित्रमंडळींना येत्या रविवारी घरी एकत्र बोलावलंय, त्याचा फोन. पण मी तर लांब गडचिरोलीला. येणं शक्यच नव्हतं.
पण त्या फोनने हादरवलंच मला. कमळी जिवंत आहे की काय? परलोकात गेले, पण आवडतच नाही मला तिथलं. मग आले पळून, असं म्हणून हसत सुटली असती कमळी. कमळीचं हसणं, म्हणजे भीती वाटायची. झेपेल का तिच्या जेमतेम तब्येतीला? पण हसत कोचावर अगदी आडवे होणे, पडणे हीच तिची रीत. हसण्याचा आवाजही एरवीच्या हळू आवाजापेक्षा दहा पटींनी मोठ्ठा. तिचं सगळंच उत्स्फूर्त. आणि वय? ऐंशीच्या पुढं! तिच्या आधीच्या रास्ता पेठेतल्या खोलीवर जायचो. खिडकीला पडदा लावला होता. त्यावर चौकोनाचौकोनाचं डिझाईन. प्रत्येकात एक गणपती छापलेला. मी म्हटलं, कमळे, इथं गणपतींची जनरल बॉडी मीटिंग आहे की काय?’ त्यावर असंच हसत सुटणं, थांबवता न येणं, आणि शेवटी आडवं होणं.
कधी त्याचं दुसरं टोकही.
उमाताईंनी पूर्णचंद्र तेजस्वींच्या चिदंबर रहस्य या कन्नड कादंबरीचा मराठीत अनुवाद केलेला. त्याचं वाचन ऐकायला आम्ही जमलेलो. तसे त्यांचे अनेक अनुवाद आम्ही त्यांच्या तोंडून ऐकलेले. तर शेवटी अनेक अनिष्ट गोष्टींनी जंगल पेटतं, सगळे होरपळून मरतात, फक्त एक तरुण-तरुणी प्रेमिक वाचतात, असं आहे. कमळी आत उठून गेली आणि ओक्सबोक्शी रडत बसली. शांत झाल्यावर म्हणाली, त्यातला शहाणा माणूस पाटील... त्याला तेजस्वींनी का मारावं? शहाण्याचा नेहमीच पराभव जिथे तिथे का दाखवतात? ज्ञानाचा नेहमीच अपमान होतो. तो का सहन करायचा आम्ही?’
आता त्यांच्या शोकाकुलतेची जागा संतापाने घेतली होती.

माझ्या पहिल्या भेटीचा अनुभव असाच. त्यावेळी त्या प्रसिद्ध लेखिका कमल देसाई होत्या. सांगलीच्या जुन्या घरातल्या माडीवर मी दबकतच गेलो होतो. त्यांनी माझी त्यावेळची माणसं, धागे आडवे उभे ही पुस्तकं वाचलेली. त्या आपल्या सगळ्या आदरणीय नेत्यांवरच घसरल्या. तुम्ही आम्हांला हे जे जग दाखवता, माणसं दाखवता, ते जग या मान्यवरांनी का नाही दाखवलं? का आम्हांला अंधारात ठेवलं?’ मी घाबरत म्हणालो, अहो, हे माहीत नव्हतं त्यांना.
त्यावर उसळून म्हणाल्या, मग कशाला म्हणायचं यांना नेते?’
तेव्हापासून मी त्यांच्या गुड बुक्समधे आहे, तो आजवर. अरेच्या, मी शेवटपर्यंत असा शब्द का नाही लिहिला? आजवर? कमाल आहे.
आणि ती किती साधी असावीसुनंदाच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांच्या नातेवाईक मुलीला दाखल करायचं होतं. मी सुनंदाला सांगून ठेवलं होतं. त्या तिथं आल्या, पण वरच्या मजल्यावर सुनंदाला भेटायला नाही गेल्या. तिथल्या माहिती देणाऱ्या टेबलवर जाऊन ऐटीत सांगणं दूरच, की माझी सुनंदाची ओळख वगैरे. सुनंदा घरी जायला खाली येईपर्यंत त्या बसून राहिल्या. सुनंदा नंतर मला म्हणाली, अरे, त्या कुठं बसल्या होत्या, माहीत आहे की? तिथं समोर खुर्चीवर नाही बसल्या. संडास आहेत ना, त्याच्या शेजार जमिनीवर मांडी घालून बसल्या होत्या.
वा! वा! या काळा सूर्य आणि हॅट घालणाऱ्या बाई या स्त्रीवादी युग निर्माण करणाऱ्या पुस्तकाच्या लेखिका, फक्त चार पुस्तके लिहिली, पण ज्यांनी प्रवाह निर्माण केला, त्या लेखिका. पण आता खेड्यातून आलेल्या पेशंटच्या नातेवाइकांसारख्या खुरमुंडी करून खाली बसलेल्या!
नंतर सुनंदाची त्यांची चांगलीच गट्टी जमली. दुपारी घरी जाताना काही वेळा ती कमळीकडे जायची. त्या मस्त जिरेभात करून लोणच्याबरोबर खायच्या. आणि नंतर पडून गप्पा मारायच्या. मी विचारायचो, पडून का? बसून नाही मारता येत?’ कमळी हसून म्हणायची, नाही, नाही. पडून गप्पा मारायला खरी मजा येते. सुनंदा गेल्यावर ती नेहमी म्हणायची, सुनंदाला मी समजले होते, इतकी मी कुणाला कळ्ळेच नव्हते.
कळ्ळं हा तिचा खास उद्गार. कुणा आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या माणसाबाबत विषय असला, तरी तिचा शेरा, त्याला नं, आपला समाज कळ्ळाच नाही. तोही शेरा तेवढ्यापुरताच.
लोणचं लावून भात खाणं, म्हणजे तिच्या सुखाचा कळसच. साधा भात. पण ती थोडं काहीतरी लावून असा चवदार करायची की बस्स. तिच्या एकटीच्या संसारात सगळाच स्वयंपाक आटोपशीर असला, तरी तिच्या हाताला चव होती. एकदा तिने उमाताईंकडे कोळाचे पोहे करून आम्हां सगळ्यांना खाऊ घातले. वेगळाच पदार्थ, चव म्हणाल तर अहाहाच!
रास्ता पेठेतल्या खोलीत गेलं, की कधी त्या पांघरूण जोडून पांघरून घेत आणि वाचत बसलेल्या असत. मी म्हणालो, अहो, बाहेर कुठं थंडी आहे? त्यात आत्ता दुपारचे अकरा बारा वाजताहेत. ती हसून म्हणाली, मला असं पांघरूण घेऊन वाचायला आवडतं. नेहमी काही ना काही वाचत असत. बहुधा इंग्लिश पुस्तकं. साहित्यावर, कुठल्या पुस्तकावर किंवा लेखकावर आम्ही क्वचितच बोलत असू. तरी गप्पा घमासान. बरं, आमच्यात समान धागा काय असावा, तर वरकरणी काही नाही. मला तिची कित्येक मतं पटायची नाहीत. आमचे लिहिण्याचे प्रकारही अलग अलगच. तरी आवडण्यासारखं भरपूर होतं. तिचा मनस्वी स्वभाव आवडायचा. ती तिच्या साठीनंतर भेटली, तरी ती कधी साडीत दिसली नाही. घरात घालायचे गाऊन मात्र तऱ्हेतऱ्हेचे. त्यावरून मी थट्टा करायचो. कधी ती टी-शर्ट पँटही घालायची. सुमित्रा-सुनीलने तिची प्रदीर्घ मुलाखत चित्रित केलीय, त्यात ती टी-शर्ट व पँटमध्ये दिसली.
साहित्याच्या एवढ्या कल्पना उच्च, अनेक आघाडीचे लेखक त्यांनी नापास केलेले. पण हिंदी सिनेमे फार आवडायचे. तेही कुठलेही. दुपारी जवळच्या अपोलो टॉकीजच्या बकाल शोला तिकीट काढताना पाहिलंय. अमिताभ बच्चन आवडता. त्याचा प्रत्येक सिनेमा जाऊन बघणार. पण त्यातही तिरपागडी अट अशी, की तो त्यांच्या अपोलोला लागला असला तरच पाहायचा. तसाच अलीकडचा आवडता लेखक हॅरी पॉटर. मराठी सीरियल पाहणं तिला आवडायचं. त्यावेळी कुणी आलं असलं, तरी सांगायची, मी आत जाते. माझी अमक्या सिरियलची वेळ झालीय. उमाताईंकडे राहायला गेल्या, तरी तिथेही तेच.
मला ती भेटली उतारवयात. तिची अनेक आजारपणं चालू असायची. प्रकृती तोळामासा. तिला मी कधी माझ्या मित्र डॉक्टरांकडे नेलंय, अगदी माझ्या स्कूटरवर मागे बसवून, तरी ती यायची. आधी कमलताई म्हणायचो, नंतर कधी कमळी म्हणू लागलो, ते कळलंच नाही. ती म्हणायची, अशोक (शहाणे) आणि तू या दोघांनाच कमळी म्हणायचा अधिकार. दुर्गा भागवत त्यांचं आदरस्थान. कमळी म्हणायची, दुर्गाताईंना माझी काळजी. म्हणायच्या, कमळे तुझं कसं होणार?’’ रा. भा. पाटणकर आणि ती अहमदाबादला एकत्र शिकवायला होते. त्यांनी कमल देसाईंचे कथाविश्व असं पुस्तकच लिहिलंय. रा. भा. म्हणजे केवढे विद्वान! त्यांच्या सौंदर्यमीमांसा या पायाभूत ग्रंथाला केवढी मान्यता मिळालेली! त्यांनी कमलताईंच्या लेखनावर असं लेखन करावं, हा केवढा बहुमान. पण कमळी तिच्या साहित्याविषयी चकार शब्द काढत नसे. कधीतरी तिची स्त्रीवादी म्हणा किंवा मनुष्य म्हणून रग मी पाहिलीय. लहानपण, तरुणपणाविषयी सांगत होती. म्हणाली, आम्ही बहिणी काळ्या होतो, म्हणून त्या सगळ्यांनी आम्हाला तुच्छ समजावं? काळं असणं हा काही गुन्हा आहे? का आम्हाला त्यावरून लोकांनी टोचावं?’ तिच्या बोलण्यात तिच्या दिवंगत थोरल्या बहिणींविषयी बरंच यायचं. त्यांच्या घरच्या खटल्याविषयी की वादाविषयी यायचं. कधी विषण्ण होऊन म्हणत असे, मला ना, आता मरायचं आहे. मी कारण विचारता, म्हणे, मला कंटाळा आला आहे. मी म्हणायचो, कंटाळा जाईल. दिवस पालटू शकतात. तब्येत सुधारू शकते. पण त्यावर म्हणाली, आता जगावर भार देऊन कशाला जगायचं?’ शेवटी विरूपाक्षांनी (कमळी त्यांना बिरुदा म्हणायची) त्यांना सांगितलं, आपण काही चॉईसनं या जगात आलो नव्हतो. जेव्हा निसर्गतः मृत्यू येईल, तेव्हा येऊ द्यावा. आपण त्यात ढवळाढवळ कशाला करायची?’ त्यानंतर मग तिनं मरणाचा विषय काढला नाही. उलट जगण्याचा आनंद ती घेऊ लागली.
सुमित्रा-सुनीलने कमलताई, एका सिनेमात काम करता का?’ विचारलं, तर ती खो खो हसू लागली. सुमित्रा म्हणाली, या हसण्यासाठीच तुम्ही आमच्या फिल्ममध्ये यावं. कमळी कोकणातल्या त्या गावी गेली आणि त्या तणावमुक्त घरात एक छान रमणारी, हसणारी म्हातारी तिनं रंगवली. रंगवली तरी कशाला म्हणा, ती आहे तश्शीच होती, अगदी कॅमेऱ्यासमोरही.
तिच्या गोतावळ्यात द. ग. गोडसे होते. ते गेल्या पिढीचे मोठे चित्रकार, माझी काही वेळा गाठभेट झालेली. त्यांनी माणदेशी माणसं या पुस्तकातल्या व्यक्तिरेखा अशा काही काढल्यात की बस्स. त्यांचं कमळीकडे जाणंयेणं. दोघं म्हातारे छान गप्पा मारत. मीही ऐकण्यासाठी सामील व्हायचो. एकदा मी कमळीला विचारलं, काय म्हणतोय तुझा बॉयफ्रेंड?’ ती आश्चर्याने बघू लागताच मी म्हटलं, गोडसे. तर ती जी हसत सुटली, की थांबेचना.
एक प्रसंग आठवतोय. एकदा जी. एं.वर भरपूर टीका केली. पण जी.ए. गेले. पुण्यात गेले. मी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन आलो आणि कमळीकडे गेलो. ही बातमी सांगताच त्या अस्वस्थ झाल्या. आणि नंतर तर ओक्साबोक्शी रडू लागल्या. मला खूप आश्चर्य वाटलं. पुढे श्री. पु. भागवत पुण्यात आले. तेव्हा माझ्या स्कूटरवर मागे बसवून त्यांना कमळीकडे घेऊन गेलो. नंतर बाईंचा मूड पालटला.

पहिल्यांदा माझ्याकडे आली, तेव्हा हॉलमध्ये तक्क्याला टेकून बसली. काही वेळानं म्हणाली, तुझ्या घरानं मला स्वीकारलंय बरं का?’ हे तिचं फॅड. मी हसलो. ती म्हणाली, अरे, खरंच सांगते. असं असतंच. घरही आपल्याला स्वीकारतं किंवा नाकारतं.
मी त्यावरनं थट्टा केली, पण ती बधली नाही. म्हणाली, तसं एखादं गावही आपल्याला स्वीकारतं किंवा नाही स्वीकारत. तिनं उदाहरण दिलं, धुळ्याला होते, तर मी धुळ्याला स्वीकारलं होतं, पण धुळ्यानं मला स्वीकारलं नव्हतं. पुढे भिवंडीला आले, तर भिवंडीनं मला स्वीकारलं. पण मी नाही तिला स्वीकारलं. असा सगळा वेडपणपणा! आणि त्या भावनांवर त्या ती नोकरी सोडत, ते गाव सोडत. कुठं एका ठिकाणी त्या टिकल्याच नाहीत. नोकरी पेन्शनीला पात्र व्हायच्या अगोदरच सोडली. अनेक ठिकाणी नोकऱ्या झाल्या. त्यामुळे सोडल्यावर कसल्याही तऱ्हेचे फायदे मिळाले नाहीत. काय म्हणावं या अव्यवहारीपणाला?
पुढे त्यांनी पुणं सोडलंच. सांगलीला गेल्या. भाच्यानं जुनी इमारत पाडून नवी बनवलेली. त्यात कमळीला स्वतंत्र खोली. सांगलीला तिचं बस्तानच बसलं. तिथल्या तरुण कविलेखकांमध्ये ती जाऊ-येऊ लागली. त्यांच्यात बसून चर्चा करू लागली. अधूनमधून त्या बाजूला जाणं झालं की वाकडी वाट करून भेटून यायचो. तिकडे त्यांचा पंचाहत्तरीनिमित्त सत्कार झाला. मी, विरूपाक्ष, उमाताई खास पुण्याहून गेलो होतो. मी तिचे वेळोवेळी फोटो काढलेले. ते मोठे करून संयोजकांकडे पाठवले. ते त्यांनी हौसेने हॉलबाहेरच्या भिंतीवर लावून छोटं प्रदर्शनच भरवलं.
इतके लोक बोलले अगदी भरभरून. (तिचा खरा गौरव सांगली-मिरजकरांनी केलाय. महाराष्ट्र त्याबाबतीत मागेच राहिला. मी अनेक फाउंडेशन्स, अकॅडम्या, सरकार यांना सुचवून पाहिलं. पण यश आलं नाही. हे अर्थाक कमळीच्या नकळत हां. नाहीतर तिनं मारलंच असतं!) तर तो कार्यक्रम मोठा हृद्य झाला. सुमित्रा-सुनीलने शूट केलेली ती मुलाखतही दाखवली. शेवटी सगळ्याला कमळी काय उत्तर देते, त्याची उत्सुकता होती. पण ती बोलेचना. कुणी आग्रह केला तर म्हणाली, इतका वेळ (त्या फिल्ममध्ये) मी बोललेच ना. आणखी काय बोलायचं?’ परत गप्प. एखादीने पंचाहत्तर वर्षांचा सुखदुःखांचा आढावा घेतला असता. गुरुजनांविषयी कृतज्ञता, वगैरे. पण कमळी गप्प. शेवटी म्हणाली, सगळं काय शब्दांतूनच व्यक्त होतं काय?’ अशी ती कमळी.
तेजस्वींच्या कर्वालो या कादंबरीच्या प्रेमात त्या पडल्या. आणि तेव्हापासून त्यांची उमा-विरूपाक्षांशी घट्ट मैत्री झाली. आम्ही बरोबर फिरायला जायचो. आमचा ग्रुपच जमला. मी त्याला चांडाळ चौकडी म्हणायचो. कमळीच्या लग्न न करण्यावरूनही थट्टामस्करी व्हायची. ती म्हणायची, कोणी योग्य भेटला असता तर केलं असतं लग्न.
मी म्हणालो, पण योग्य कोण? एखादं उदाहरण?’ ती म्हणाली, महाभारत लिहिणारा व्यासच एक माझ्यासाठी योग्य आहे. म्हणालो, कमळे, तुला तो योग्य नवरा मिळेल, पण व्यासांचं काय होईल?’ हशाच हशा.
विरूपाक्ष म्हणाले, व्यास म्हणजे राख फासलेला, कित्येक महिने अंघोळ न केलेला, जटा न विंचरलेला असणार... परत हशा.
उमा-विरूपाक्ष संकोची. ते त्यांची थट्टा करायला मागे राहात. ती तर कसले बंधन नसलेली. पण तेही हळूहळू या कल्लोळात, थट्टा करण्यात, करून घेण्यात सामील होऊ लागले. क्या बोला!’ म्हणून कमळी टाळीही देत असे.
उमाताईंची कादंबरी मोठी असली, की दोन दोन दिवस वाचन चालायचं. त्यांच्याकडे दुपारचं जेवण, झोप. परत वाचायला बसायचे.
भैरप्पांनी महाभारतावर लिहिलेली पर्व कादंबरी तिला अजिबात आवडली नाही. त्याला महाभारत कशाशी खातात, ते समजलं नाही. त्यानं लिहिताच कामा नये. त्यांच्या संतापाला मी पंक्चर केलं. म्हणालो, तुझ्या व्यासाचं महाभारत म्हणून तुझी परवानगी घ्यायला हवी होती का?’ त्यावर तसंच हसत सुटणं.
एकदा त्यांच्याकडून आम्ही अस्तित्ववाद ऐकला होता. असेच दोन दिवस सलग. तेव्हा बोलणारी कमळी नेहमीची नव्हती. वेगळंच माणूस बोलतंय जसं.
पुढे सांगलीहून त्या पुण्याला निळावंती बंगल्यात राहायला आल्या. भावाचं निधन झालेलं. भाचा दिलीप आणि भाचेसून नंदू त्या घरात. आणि भावाची पत्नी, त्यांना आम्ही वहिनी म्हणायचो. त्या कमळीपेक्षाही वयानं थोड्या मोठ्या. त्या घराची आठवण जास्त करून माझ्या गाणं म्हणण्याची. केव्हा तरी पहाटे दरवेळी म्हणवून घ्यायच्याच. त्यांच्या वहिनीही येऊन बसायच्या. वहिनी शेवटच्या आजारी पडल्या, तेव्हाही खूण करून मला हेच गाणे म्हणायला लावलं. कमळीला गझल आवडायच्या. त्यात आवारगीची गझल फार आवडायची. इस दश्त मे इक शहर था, वो क्या हुआ, आवारगी ही ओळ त्यातली जास्त आवडती. या वाळवंटात एक शहर होतं, ते कुठं गेलं? म्हणायची, फार गूढ अर्थ आहे त्यात. कधी अब के हम बिछडे...ची फर्माईश... तर कधी रंजिशीची. मला म्हणायची, तू गाण्याकडे लक्ष पुरवायला हवं होतंस. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आमच्यावर अऩ्याय केला आहेस.
मी म्हटलं, बरोबर. मी एक गायक झालो असतो. मग मी लिहिलं नसतं. ते चाललं असतं?’
ती निरुत्तर. पण परत पुढच्या वेळी तेच वाक्य. एकदा तिने एक गझल कशी म्हणायची असते, त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. कुठल्या शब्दावर भर पाहिजे, कुठं गॅप घेतली पाहिजे, वगैरे. मी अलीकडे शास्त्रीय रागांच्या चिजा शिकत होतो. मग काय, शिकलो की, पहिलं प्रात्यक्षिक कमळीपुढं.

कमळी माझी दोस्त कशी झाली? तिचा तिरपागडेपणा माझ्यात नावालाही नाही. मी सरळ सगळ्यांसारखा विचार करणारा, सगळ्यांच्या भाषेत सगळ्यांना समजेल असं बोलणारा, लिहिणारा. ती ज्या प्रकारची लेखिका, त्यातला मी नव्हतो. ती गावांशी, घरांशी, घरातल्या वस्तूंशी बोलणारी. मला तो वेडपटपणा वाटायचा. तिला म्हणायचो, तुला सायकियाट्रिस्टकडे नेलं पाहिजे. पण नको. तोही वेडा होईल. म्हणायला लागेल, हा पेन आत्ताच म्हणत होता, पण तेवढ्यात हा स्टेथो मधेच बडबडला.
कमळी हसून बेजार. उत्सुकतेचे म्हणाली, मग पुढं? स्टेथोला काय म्हणायचं होतं?’
थट्टा करता करता मला त्याची कधी बाधा झाली कळलंच नाही. फिरायला जायचो, तिथली झाडं बोलू लागली. जंगलातल्या वाटा बोलू लागल्या. एवढंच काय, डोक्यावरचा पंखा, दारापासल्या चपला बोलू लागल्या. मग त्यातनं गोष्टी लिहू लागलो. काही वेळा तर असं झालं, लेख लिहायला घेतला. असह्य परिस्थितीतून ज्या व्यक्तीला पुढं जायला वाटच नाही, अशी अशक्य परिस्थिती. तिथं लगेच ही कमळीची फँटसी आली. तिनं एक काय, अनेक रस्ते दाखवले.
मी आनंद (नाडकर्णी)ला म्हणालो, हे सगळे माझ्याशी बोलतात. हे जेव्हा खरं वाटू लागेल, तेव्हा मी तुझ्याकडे ट्रिटमेंटला येईन. कमळीच्या रस्त्याने जाऊ लागलो, तसं मला या विविध वस्तूंना, जीवांना काही अस्तित्व आहे, असं जाणवू लागलं. आपल्यासाठी झिजणाऱ्या चपला. या जुन्या झाल्या की नव्या घ्यायच्या, या फेकून द्यायच्या, हाच माझा खाक्या. आता मला चपलांविषयी अगत्य वाटू लागलं. कृतज्ञतेने मन भरून आलं. कमळीच्या पागलपणात सामील झाल्याने हे मला मिळालेलं धन. थ्रो अवे संस्कृतीपासून दूर होतोच. पण आता याच पागलपणाने वेगळी मजा आणली, तसंच लालित्यही.
अगदी रास्ता पेठेतल्या घरात तिचा माझा एक करार ठरला होता. दोघांनी एकमेकांवर जिवंत असेतो लिहायचं नाही. मी आधी गेलो, तर तिनं लिहायचं, आणि ती आधी गेली, तर मी. तरी करार मोडून ती माझ्यावर कादंबरी लिहिणार होती. ते मागं पडलं. मग लेख लिहिणार होती.
आता सगळंच संपलं. मी अगदी जिवावर आल्यासारखं लिहायला घेतलं. दोन तीन पानं लिहिली. ते जमेना म्हणून पानं फेकून दिली. परत एकदा तस्संच झालं. मग मी कमळीला म्हणालो, तू आता गेली आहेस ना, मग मला ठल्याप्रमाणे लिहून का देत नाहीस?’
आता गडचिरोलीला आलो. निवांत घर, शांत वातावरण. सगळे आपापल्या कामावर गेलेले. तेव्हा कमळी पेनातून आली आणि पेपरावर उतरतच गेली. कमळे, मी करार पूर्ण केला आहे. आता मी जाईन, तेव्हा तू लिहायचं. कशावर लिहिशील? आभाळावर ढगांच्या पेनने? की समुद्रावर वाऱ्याच्या लेखणीने? की कुरणांवर झाडाच्या पेन्सलीने?
आणि म्हणू नकोस, की हा निरोप कळ्ळाच नाही!

(‘अंतर्नादच्या २०११च्या दिवाळी अंकातला लेख, अवचटांच्या परवानगीने इथे. फोटोही त्यांनीच काढलेला.)

Wednesday, November 2, 2011

चैतन्य आणि चिंतन

कमल देसाई यांची संजय आर्वीकर यांनी घेतलेली मुलाखत  ‘नव्या अवकाशातील आनंदयात्रा’ या पुस्तकात आहे. वेगवेगळ्या मुलाखतींचं संकलन असलेलं हे पुस्तक ‘पद्मगंधा प्रकाशना’ने २००७ मध्ये प्रसिद्ध केलं. या मुलाखतीतील हा थोडा भाग-


प्रारंभी तुमच्या बालपणाबद्दल थोडं सांगाल?
- माझे बालपण अतिशय मजेत आणि छान गेले. सुखाचे असा शब्द मी मुद्दाम नाही वापरला. ‘मजा’ हे मला जास्त महत्त्वाचे वाटायचे. आम्ही ब्राह्मण गल्लीत राहत होतो. ब्राह्मणांचेच सगळे संस्कार. त्या वेळी बाकीच्या जाती-जमातीशी संबंध आला असे काही नाही. तरी मला असे वाटते की, आम्ही पुरेसे सामाजिक होतो. आमच्या घरातले वातावरण अतिशय चांगले होते. अनेक जाती-जमातींचे लोक आमच्या घरी येत असत. आमच्या घरात खुलेपणा होता आणि कुठल्याही माणसाचा वावर अगदी सगळीकडे असायचा. अगदी स्वयंपाकघरापर्यंत. आम्ही घरातूनच सुधारक होतो. माझे वडील तर अपरंपार सुधारक होते. सोवळे-ओवळे असले काही नव्हते.
माझी बहीण मामाला दिली असल्याने मी बहिणीकडे मुलीसारखीच वाढले. तिथे माझे जे बालपण गेले, त्याच्या भोवतालचा परिसर ब्राह्मणी असला तरी आमच्याकडे तसे काही नव्हते. शेजारपाजारचे म्हणतही असत की, हे सुधारकी कुटुंब आहे.
आणि दुसरी एक गोष्ट मला जाणवते जी मला महत्त्वाची वाटते की, वयाच्या अगदी तिसऱ्या वर्षांपासून मला अगदी एकटे असण्याची फार सवय होती. मला आवडायचं. एकटं असण्यात गोडीच होती. नुसतं इकडे-तिकडे आपले आपण हिंडायचे. आपले आपण राहायचे. आमच्या कुटुंबात इतकी माणसे होती ना, तरी माझे मला आपले एकटे एकटे असण्यात आनंद वाटायचा. गवतातच नाच, कुठे याच शेतात जा, तिकडेच जा, कुठेही जा..

म्हणजे अवतीभोवती माणसांची गर्दी असली तरी एकटं एकटं असणं हे तेव्हापासून का?
-अगदी.. आणि माझ्या त्या एकटेपणावर कोणी एन्क्रोचमेन्ट केलेले मला चालायचे नाही. दुसरीही एक गोष्ट होती की, मी घरातही फार लाडकी होते. खरे म्हणजे मी सर्वांत मोठीही नाही आणि लहानही नाही. घरात तर लहान मुले होती. त्यात मीच का लाडके असावे घरात, ही मला अजूनही न कळलेली गोष्ट आहे. अजूनही! मी.. हे आमचे सांगलीतले घर आहे किंवा कोल्हापूरचे सगळे नातेवाईक आहेत कोणाच्याही घरी मी म्हणजे काहीतरी प्रेशियस गोष्ट आहे.. हे का, हे एक कोडे आहे, तसेच गल्लीमध्ये मी सरसकट मुलांमध्ये मिसळत असे. घरात, कोणी असे मिसळू नये, असे वागू नये, असे कोणी कधी म्हटले नाही. मला मित्र-मैत्रिणी भरपूर, हे सगळे असले तरी माझे माझ्या खोलीत मला एकटे कोंडून घ्यायला आवडायचे. आणखी एका गोष्टीचे मला नवल वाटते. तशी मी काही हुशार नव्हते, सुंदर नव्हते, तरीही गल्लीत कुठूनही मला हाक ऐकू यायची, ‘कमळे, आज घरात हे केलेले आहे.. तू ये बघू इकडे.’ गल्लीतसुद्धा कुणाच्या घरी काही नवा पदार्थ केला तर तो माझ्यासाठी ठेवला जायचा. मला खाण्याचे काही वेड नाही, तरीही हा पदार्थ ठेवला जायचा, हे काय आहे हे अजूनही कळत नाही.
आमच्या शेजारी भोगले मास्तर होते. त्यांना फिड्ल वाजविण्याची सवय होती आणि त्यांचे वडील आजारी होते, तेही चांगले गणिताचे शिक्षक. त्या दोघांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते. ते अगदी अंथरुणावर असले तरी दणदणीत आवाजात हाक मारायचे मला.. ‘कमळेऽऽ’ अशी हाक ऐकली, की मी त्यांच्यासमोर जाऊन उभी राहायची अन् म्हणायची ‘काय?’ मला त्यांची थोडीशी भीती वाटायची तरी पण त्यांची हाक ऐकली की मी पळत सुटायची. धावणं हा एक स्वभाव होता माझा. सगळ्या गल्लीत धावत सुटायची आणि फुलं गोळा करायची, पण मला असे जाणवले नाही बरे का की, माझ्याजवळ चैतन्य होते म्हणून लोक असे काही. अजूनसुद्धा माझ्याभोवताली जे लोक जमलेले आहेत, या लोकांनी का म्हणून माझ्याजवळ यावे आणि मला इतके प्रेम द्यावे, हे न उलगडलेले कोडे आहे, पण मी गल्लीतसुद्धा लीडर होते.

आणि शाळेमध्ये असे काही होते..?
-हॅऽ ट्.. शाळेत तर माझ्यापेक्षा.. काय असायचे माहितीय का, नाटकात काम करायला, ऐन वेळी कोणी गळले, नाही म्हटले तर ऐन वेळी पटकन संवाद पाठ करून उभे राहायला कोण तर.. कमळी.. अरे, तिला बोलव रे, असं. पण मला असं वाटत नाही, मी शाळेत एक चांगली स्टुडण्ट होते म्हणून.

लेखिका म्हणून जडणघडण होण्याशी तुमच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाचा काही संबंध होता का?
-काहीही संबंध नाही. काडीचाही संबंध नाही. उलटा परिणाम वाईट आहे त्याचा. आमचे संस्कृतचे शिक्षक ‘शाकुंतल’ शिकवायचे- अबबऽऽ! इतके घाणेरडे कुणी शिकविले नसेल आणि पुढे आम्हाला असा एक प्रश्न आला होता- तुम्हाला ‘शाकुंतल’ नाटकातला कुठला अंक आवडतो?- तर सगळेजण सांगायचे ना, चौथा अंक सगळ्यात उत्तम, तर मला ते आवडायचे नाही- तर मी वर्तमानपत्रात लिहिले की, सगळे असे म्हणतात की, चौथा अंक चांगला आहे, आपल्याला शिक्षकही हेच सांगतात; परंतु मला मात्र तिसरा अंक जास्त आवडतो आणि त्या अंकात जो प्रणय आहे तो अत्यंत लालित्यपूर्ण आहे. अतिशय लव्हिंग आहे. पाचवा अंकही तितकाच चांगला आहे, पण पाचव्या अंकात विरह आणि त्याच्यात मेलन्कोलिक शेड आहे- माझ्यासारख्या तरुण मुलीला तिसरा अंक जास्त आवडेल की नाही?

१९६२ मध्ये तुमचा पहिला ‘रंग’ हा कथासंग्रह आला. या तुमच्या पहिल्याच कथासंग्रहापासून ब्राउनिंग, डोस्टोव्हस्की, सात्र्, जे. कृष्णमूर्ती, चिनी लोककथा, कॅथार्सिस, शनी माहात्म्य, संत नामदेव असे वेगवेगळे संदर्भ येतात. यात केवढे वैविध्य आहे. तर या संदर्भात तुम्ही स्वत:च्या वाचनाच्या प्रवासाबद्दल काही सांगाल?
- मला स्वत:ला कथा हा वाङ्मय प्रकार आवडतोच. कथा सांगणं, कथा वाचणं, कथा निर्माण करणे, यात मला रसच. कुठेही पुराण सुरू असलं, की तिकडे जाऊन बसायचे अन् ते ऐकायचे. घरातही असे जे वाचतात ते पण ऐकायचे आणि मग वाटायचे की, गमतीच्या कथा आहेत हं या!
कथा करणे ही पण एक गंमत आहे आणि कथा काय.. करीत बसायची आपली आपल्याशी, हा नाद होता मला. काव्य हा प्रकार माझा आहे का, तर नाही, हे मला माहीत होतं. कथा हा प्रकार माझा आहे, तो कसा माझा आहे, तर तो माझा श्वासच आहे. म्हणजे मला जितके जेवायला लागते, तितकी मला कथा चावायला लागते. मग कथा, कादंबरी, नाटक, जे जे म्हणून अशा पद्धतीचे आहे ते ते मला आवडते. त्यामुळे काय झाले, की मी काही असे ठरवून वाचलेले नाही, काय मिळेल ते वाचले आणि असे कोणी कधी मला सांगितले नाही की, हे वाच आणि ते वाचू नको. किंबहुना ज्या वयात जे पुस्तक वाचू नये, हातीही लागू नये, ते मी वाचले. ‘काम आणि कामपूर्ती’ असे एक पुस्तक माझ्या हाती लागले आणि ते मी वाचले, पण कोणाला काही कळलं नाही की, ते मी वाचलंय आणि मला काही कळलंय. म्हणजे वाचनात काही शिस्त होती असं नाही.
पण एक गोष्ट जशी मला समज आली तेव्हापासून कळले होते की, माणसाने नैतिक असावे आणि स्वत:शी प्रचंड प्रामाणिक असले पाहिजे. स्वत:शी हं, लोकांचा त्याच्याशी काही संबंध नाही. मी स्वत:शी खोटं बोलते आहे, असे लक्षात आले तर मी स्वत:ला शिक्षा करून घ्यायची. मला ते खपतच नाही. अजूनसुद्धा नाही. हे एक माझे मूल्य होते आणि हे घेऊन जगत असताना मला जे, जे काही अनुभव येत गेले त्या अनुभवावरून मी माझे जीवन आखण्याचा प्रयत्न केला.

कथालेखन सुरू कसे झाले याबद्दल काही आठवते का?
- एकदा काय झाले की, मला शाळेत नोकरी लागली. शिक्षिकेची. तर ते शाळेमध्ये डेप्युटेशनवर वगैरे पाठवितात ना, तर एकदा मला असे वाटले की, समजा मला नाचासाठी डेप्युटेशनवर पाठविले तर किती गंमत येईल ना.. आणि आमच्या त्या हेडमिस्ट्रेस बाईंना नाटक, नृत्य, कला यांची आवड होती आणि त्यांना माझ्याविषयी कौतुकही होतं.

म्हणजे लेडी विठोबा?
- गंमत वाटली त्या गोष्टीची मला आणि मी ती लिहून ठेवली आणि त्याचे मी पुढे काही केले नव्हते आणि माझा भाऊ आजारी असताना त्याला ती वही सापडली आणि त्याने ती संबंध वाचून काढली आणि म्हणाला, ‘कमळे बरी दिसते गं ही. बघ ‘सत्यकथे’ला पाठवून. माझा दुसरा भाऊ, जो इंग्रजीचा प्रोफेसर होता, त्यानं त्यात हजार चुका काढल्या. ‘तू काही नीट लिहीत नाहीस, तू काही अक्षर नीट काढत नाहीस. लिहिताना नीट नको का लिहायला.’ त्याचा जरा नीटनेटकेपणाकडे कल होता. मला नीटनेटकेपणाचा भयंकर कंटाळा. सारखं काय नीट-नीट. मी घरात एक अत्यंत आळशी, लवकर उठायला नको, काम करायला नको अशी होती.
..तर ती माझ्या इंग्रजीच्या प्राध्यापक भावाने माझ्याकडून नीट लिहून घेतली आणि मग ती पाठविली. मग ती छापून आल्यावर माझी मीच चकित झाले आणि श्री. पुं. नी. (भागवत) मला एक छान पत्र लिहिलं होतं त्या वेळी. तरीसुद्धा मला असं काही वाटलं नाही की, आपण कथाकार आहोत.

तुमचं लेखन वाचत असताना असे लक्षात येते, की  त्यात संगीत, चित्रकला, नाटक यांचे बरेच तपशील आहेत. या कलांशी तुमचे नाते कसे आहे?
- पूर्वी आम्ही मिरजेला राहत होतो आणि थिएटर जवळ होते. बालगंधर्वाचा मुक्कामही असायचा. बालगंधर्वाची जवळजवळ सगळी नाटके मी एकटीने पळत पळत जाऊन पाहिलेली आहेत. त्यांनी केलेली भामिनी मी पाहिलेली आहे आणि मला मुळीच बालगंधर्व आवडायचे नाहीत. इतरही कंपन्यांची नाटकंही पाहिलीत. आनंदघन मंडळींच्या नाटकाच्या मधल्या काळात सिनेमा असायचा. हे मध्येच सिनेमा दाखविणं मला फार आवडायचं आणि तो नाटकामध्ये आत सोडणारा डोअरकीपर आमच्या घरी काम करणारा होता आणि मग म्हणायचा, ‘आली का बाळी माझी’ असं म्हणून आत नेऊन बसवायचा. त्यातले मला काय कळायचे तेव्हा माहीत नाही, पण तो ऑर्गनचा आवाज, गाणे, पडदे, ते नारळ फोडणे, ते घंटा वाजवणे या सगळ्यांचा माझ्यावर भयंकर परिणाम व्हायचा आणि नांदी तर मला खूप आवडायची. विनोदाकडेही माझा ओढा होता. संगीतातला  सूर पकडणे मला कळायचे. चित्रे काही मी त्या काळात बघितली नाहीत, पण नंतरच्या काळात मी ज्या वेळी अ‍ॅस्थेटिक्सचा अभ्यास केला, त्या वेळी चित्रकलेकडे बघायला सुरुवात केली आणि माध्यम या नात्याने रंगरेषांकडे पाहायला सुरुवात केली. पण अजून मला असे वाटत नाही की, चित्र आपल्याला समजते. खरे तर कोणत्याही कलेतले मला काहीही कळत नाही. किंबहुना मला काही समजत नाही हेच मला नीट समजतं.

त्या काळामधली जी काय कथा होती, त्याबद्दल तुमचं काय मत आहे?
- खरं सांगू का, गाडगीळ, गोखले जेव्हा लिहीत होते, तेव्हा त्यांच्या कथांमधून मला एक जाणवायचं, की 'मला असे वाटते..' अशा प्रकारची वाक्यरचना होती. मला असं सारखं वाटायचं, की ही वाक्यरचना कुठेतरी चूक आहे. ‘असे वाटते.. असे वाटते’ ही काय भानगड आहे. ‘असे त्याला वाटले..’ हे असं सारखं काय येतं हे ‘वाटणं’ ही काय भानगड आहे. वाटणं हा शब्दच कथेमध्ये येता कामा नये.
म्हणजे भाषेच्या पातळीवर मला त्यांच्या कथा आवडायच्या नाहीत आणि त्या सायकॉलॉजिकल असतील तर त्या अशा असता कामा नये, असंही वाटायचं. आम्हाला सेक्सविषयी समजत नाही म्हणून सेक्सविषयी लिहिलं पाहिजे असं दडपण माझ्यावर होतं सारखं. तरीही सेक्सविषयी लिहायला माझं मन घेत नव्हतं. माझं मन बंड करून उठत असे आणि सेक्स वगळून दुसरं काही लिहिता येईल का, असा विचार सारखा माझा चालायचा. त्या काळामध्ये सगळे लेखक सेक्स-ओरिएंटेड कथा लिहीत होते. आणि अशी कथा विभावरी शिरूरकरांनी आधी सुरू करून दिलेलीच होती. मला शिरूरकरांच्या कथा फारशा पसंत नव्हत्या.. माझं बंड त्याच्या विरुद्ध, पण ते कसं दाखवायचं हे मला समजत नव्हतं आणि त्याचा थोडासा मार्ग मला ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ यात सापडला आणि तिथे मी जरा मोकळी होण्याचा प्रयत्न केला.

विस्कटलेल्या कुटुंबाची प्रतिमा तुमच्या लेखनात वारंवार पुनरावृत्त होते, या विस्कटलेल्या कुटुंबाचे चित्रण करणाऱ्या ‘कुटुंब कथा’मधून अंतिमत: तुम्हाला विस्कटलेल्या विश्वाच्या पसाऱ्याचे लघुत्तम रूप उभे करायचे असते का? विश्वरचनेच्या पेशी (सेल्स) या अर्थाने तुम्ही कुटुंबाकडे पाहता का?
- याबद्दल काही सांगता येणार नाही मला, पण भारताबद्दल, महाराष्ट्राबद्दल मला असे वाटते की, सोसायटी इज्  सिक्.. एरिक फ्रॉम म्हणतो तसं.. आपली सोसायटी सिक् आहे.. ती मृतच आहे, मला तर वाटते की, आपण सारे प्रेतात्मे आहोत आणि जगण्याचे कुठल्याच पातळीवर भान आपल्याला नाही. ही जी जगण्याची प्रक्रिया सुरू आहे.. ती यंत्रवत सुरू आहे. समाज असा या महाराष्ट्रात कुठेही नाही. उलट आहेत त्या टोळ्याच टोळ्या. जातींच्या बांधलेल्या टोळ्या.. या जातीची टोळी, त्या जातीची टोळी आणि या भरभक्कम बांधलेल्या टोळ्या. एकमेकांशी स्पर्धा करतायत. या स्पर्धेतसुद्धा जगण्याचे, अस्तित्वाचे भान नाही. यांत्रिक पारंपरिक जी घडण घडवून दिलेली आहे.. चौकटीत अडकलेले हे मृत आत्मे आहेत. त्यामुळे मला विचारले की, या समाजाला काही भवितव्य आहे का, तर नाही. मला भीती वाटते.. या समाजाला काही भवितव्य आहे असे मला वाटत नाही.
आता मी या लहान मुलांकडे पाहते तेव्हा वाटते, यांना नीट जीवन मिळेल..? हा एक प्रश्न आणि मिळावे ही इच्छा.. या इच्छेने जर खरोखरच भविष्यकाळ आला तर मला आनंद होईल, पण तसा तो आत्ता मला दिसत मात्र नाही.

तुमच्या लेखनातून तुम्ही अशा चाकोरीतल्या जीवनाबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करता- जसे ‘रंग’मधील सुमित्रा म्हणते, माझ्या दु:खाला नाव देण्याची, उदात्त करण्याची तुम्हाला घाई झाली आहे, तुमची नायिका अशीच असते, बावळट, कारुण्याने ओथंबलेली किंवा ‘रात्रंदिन’मधील वहिनीचं वर्णन. ते ‘स्व’त्व हरवून मूल्यविहीन जगणं आहे, असं तुम्हाला वाटतं का?
- घालून दिलेल्या सांस्कृतिक चौकटीमध्ये जगायचं.. अठरा वर्षे झाली, मुलीला स्थळ बघा, लग्न करा, चांगला नवरा बघा, त्याला नोकरी आहे ना नीट.. सुरक्षित नोकरी करणारा.. मग घर बांधायचे.. दोन मुले व्हायची, माझे म्हणणे असे आहे की, जीवन अफाट आहे. अंधारात उडी घेऊन नावीन्याचा शोध घ्यावा.. बघावं, काहीतरी वेगळे करावे, असे कुतूहलच नाही. या उबवलेल्या जीवनात किती दिवस तीच स्वप्ने, तेच तेच असे खुळ्यासारखे जगत राहणार आहोत आपण! या अफाट जीवनाच्या असुरक्षित अशा अंधारात उडी घेऊन नवीन शोधायचा प्रयत्न करणारी पिढी जर मिळाली तर मला हवी आहे. मी स्वत: केलेले आहे तसे, त्यामुळे मला हे म्हणण्याचा अधिकार आहे. मी ज्या दिवशी बाहेर पडले घराच्या त्या दिवशी रात्रच होती, काळोख होता, धारवाडातलं घर होतं आमचं.. आणि मी, एकटीच स्टेशनवर गेले, मी मुंबईच्या गाडीत बसले, पण हेही खरं की, मला मुंबईने खूप गोष्टी दिल्या, मुंबईने खूप शिकवले.. असुरक्षित जीवनाला न भिता, अंधारात उडी घेऊन, कुतूहलाने जीवनाचा शोध घेतल्याशिवाय आज आपल्याला पर्याय नाही, असे प्रत्येक स्त्रीने व्यक्ती म्हणून स्वप्न डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.

तुमच्या बहुतेक कथांचा फोकस हा स्त्रियांवर असतो. स्त्री, तिचे इतरांशी संबंध, सामाजिक संबंध, तिच्यातील आदिमतेचा अंश, समाजाची तिच्याकडे बघण्याची दृष्टी.. तुमचं लेखन स्त्री- केंद्रित, चांगल्या अर्थाने स्त्रीवादी आहे, असे म्हटले तर ते तुम्हाला मान्य होईल का?
- हो, हो. का नाही मान्य होणार? आवडेल मला. मात्र हेही खरं की, मी लिहीत असताना मात्र असे काही करते आहे हे मला माहीत नव्हते. एवढेच की, मी स्त्री असल्याने मला माहीत असलेल्या गोष्टी लिहायच्या एवढाच उद्देश होता. मग पाटणकरांचे पुस्तक आले, तेव्हा कळले की, त्याच्यात असे काहीतरी आहे म्हणून. नंतर लोकांनी त्याच्यात आणखीही शोधले.
मला स्वत:ला व्यक्ती म्हणून प्रस्थापित करायचे आहे, हे भान ठेवून मी हे केले. कारण हे जाणवत होते की, पुरुषसत्तेमध्ये हे आपल्याला भाव देत नाही आणि आपले जगणे नाकारतात, आपले अस्तित्व नाकारतात आणि यांना कुणी हा अधिकार दिला हो, आपले जगणे आणि अस्तित्व नाकारण्याचा? कोण लागून गेलेत हे? पशू-पक्षी काय, माणसे काय, या सगळ्यांना या जीवनामध्ये ‘अस्तित्व’ आल्यानंतर त्या अस्तित्वाचा सन्मान करायला तुम्ही शिकणार आहात की नाही? हे कोणी सांगितले तुम्हाला की हे नाकारायचे आहे म्हणून?
मला हे नाकारणे आवडले नाही. मी याविरुद्ध बंडच पुकारले. मी व्यक्ती आहे आणि मी स्त्री व्यक्ती आहे आणि स्त्री व्यक्ती म्हणून मी जगणार आणि तुम्हाला मी जगले हे दाखविणार आणि तुम्हाला माझे अस्तित्व मान्य करायला लावणार, इतका मोठ्ठा आविर्भाव घेऊन मी जगण्याचा प्रयत्न केला.
पण त्या वेळी असे काही डोक्यात नव्हते की, आपण लिहायचे किंवा असे काहीतरी करायचे..

मराठी साहित्याचा पन्नासहून अधिक वर्षांचा कालखंड तुम्ही पाहिला आहे. या काळातील कोणती पुस्तके किंवा लेखक तुम्हाला महत्त्वाचे वाटले की, ज्यांचा तुम्ही माइलस्टोन असा उल्लेख कराल?
- खरं सांगायचे तर मला हा प्रश्न रुचत नाही. कारण मला सर्व प्रकारचे वाचायला आवडते आणि वाट्टेल ते वाचणे हा माझा स्वभाव आहे. मी मराठीतील सगळे पॉप्युलर लिटरेचर वाचलेले आहे, म्हणजे सगळा बाबा कदम वाचलेला आहे आणि तो मला अगदी आवडत नाही असे नाही. शिवाजी सावंतची ती कर्णावरची मोठ्ठीच्या मोठी कादंबरी मी मोठ्या आवडीने वाचली. स्त्रियांच्या ज्या कादंबऱ्या आहेत- म्हणजे सुमती क्षेत्रमाडे वगैरेपण मी वाचल्या आहेत. वाचताना हे नको, ते नको असे न करता सगळे वाचावे. त्यातही काही न काही पटकन घेण्यासारखे असते. आपल्याला जे आवडते ते आपण ठेवतो. मराठीमध्ये बघ, फाळणीसंबंधी फारसे कोणी लिहिलेले नाही, पण पॉप्युलर लिटरेचरमधल्या एका लेखिकेने (मला तिचे नाव आठवत नाही) फाळणीमुळे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराविषयी एक सबंध कादंबरी लिहिली आहे. फाळणीविषयी आपले दुर्लक्ष झालेले असताना एक पॉप्युलर लिटरेचरमधली बाई त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहते, याचे मला कौतुक वाटले. म्हणून मला असे वाटत नाही की, अमुक एक लिटरेचर मोठे असते आणि दुसरे लिटरेचर कमी महत्त्वाचे असते. मला लहान मुलांची पुस्तकेही आवडतात.
दुसरी गोष्ट अशी की, साधारण १९५० हे जर आपण वर्ष घेतले आणि मर्ढेकरांपासून सुरुवात केली तर मर्ढेकरांना मराठीचे टी. एस. इलियट समजले जाते. मला काही खास करून मराठी काव्यच कधी आवडले नाही. मर्ढेकरांची कविताही मला आवडत नाही. ती समजली न समजली यात मी जात नाही. खरे म्हणजे चित्रे, कोलटकर यांच्यापासून मला मराठी कविता समजायला लागली, आवडायला लागली, पण मर्ढेकरांच्या काळामध्ये मला शरच्चंद्र मुक्तिबोध जास्त आवडायचे. त्यांच्या कादंबऱ्या आणि कविता दोन्ही. ते माझ्या विचारांना जवळचे वाटायचे.

कमल देसाई : खोलीभर प्रकाश

- संजय आर्वीकर


(कमलताई गेल्यानंतर 'लोकमत'च्या 'मंथन' ह्या रविवार पुरवणीत आलेला लेख)

१९८१मध्ये मी पहिल्यांदा कमल देसाई यांचे 'काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई' हे पुस्तक वाचलं. पुढे 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' वाचलं. 'रंग' हा त्यांचा पहिला कथासंग्रह मिळवण्यासाठी मी अनेक वाचनालयं धुंडाळली. मग 'रंग २' मात्र सहज मिळालं. मग खूप वर्षं शोधत असलेला खजिना अचानक सापडावा तशा कमलताई 'साक्षात' भेटल्या, त्या २००३मध्ये.
१९९८पासून मी मराठी वाङ्मयाला वेगळं वळण देणाऱ्या लेखकांच्या मुलाखतींच्या एका प्रकल्पावर काम करत होतो यात कमल देसाई यांची मुलाखत असावी अशी माझी फार इच्छा होती. मी संपर्क साधला त्यावेळी त्या, पर्यावरणवादी कार्यकर्त्या वंदना शिवा यांच्या 'स्टोलन हार्वेस्ट' या पुस्तकाचा मराठी अनुवाद करत होत्या. 'तो झाला की मी येते', असं त्या म्हणाल्या.
आपलं गप्पा मारणं - खूप हसणं - सटरफटर खायला आवडणं - टीव्हीवर हिंदी सिनेमा बघणं - जेवणात लोणची अपरिहार्य असणं - अजिंठा वेरूळ बघायला जायचं असणं - सगळं एन्जॉय करणं याबद्दलही त्यांनी पत्रात लिहिलं होतं. स्वतःचं वर्णन लोणची + लेखन = गोष्टीवेल्हाळ म्हातारी कमल देसाई - असं त्यांनी केलं  होतं. या पहिल्याच पत्रभेटीत मैत्रीचं भरघोस आश्वासन होतं. मी तर पत्र वाचता वाचता केव्हाच पोहोचलो होतो, त्यांच्या सांगलीतल्या खोलीत. नंतर मी प्रत्यक्षातही गेलो. मध्यभागी पलंग आणि आजूबाजूला पसरलेली पुस्तकच पुस्तकं.
- आणि मग जुलै २००३मध्ये आम्ही ती बहुचर्चित मुलाखत केली, जी 'पद्मगंधा'च्या २००३च्या दिवाळी अंकात प्रथम प्रकाशित झाली. आणि माझ्या 'नव्या अवकाशातील आनंदायत्रा' या 'पद्मगंधा'नं प्रकाशित केलेल्या पुस्तकातही.
कमलताईंनी प्रथम भेटीतच माझ्यासोबत त्यांच्या खोलीतला आकाशापर्यंत विस्तारलेला बहुरंगी प्रकाश दिला. त्यानंतर आमच्या अनेक प्रत्यक्ष दीर्घ भेटी झाल्या. मुलाखतीच्या काळात आम्ही एकत्र घालवलेले दिवस हा माझ्या आयुष्यातील अत्यंत आनंददायी कालखंड आहे. ते एक अपूर्व सहजीवन होतं; ज्यात माझी पत्नी- मृदुल आणि मुलगी- ऋचा, मुलगा- हृषिकेश हेही सहभागी होते. कमलताई सगळ्या कुटुंबाच्या आणि सगळं कुटुंब कमलताईंचं असं झालं असतानाही एक 'ज्ञानसमृद्ध-ऊर्जा-केंद्र' आपल्या अवतीभवती सतत वावरत आहे असं भान मला येत होतं. चैतन्याचा एक खळाळता स्रोत आपल्याभोवती आहे, असं मला नेहमीच वाटत आलं आहे.
आठ वर्षांच्या या सहवासात, शहाणं करून सोडणाऱ्या, जीवनावरची श्रद्धा बळकट करणाऱ्या अनेक आठवणींशिवाय कमलताईंनी एक भलं थोरलं बक्षीस मला दिलं. त्यांचा वेचक पुस्तकसंग्रह त्यांनी माझ्या हवाली केली.
पुढं 'काळ्या सूर्याखालच्या गोष्टी' हे 'लोकवाङ्मय गृहा'नं प्रकाशित केलेलं पुस्तक संपादित करताना आम्ही वेळोवेळी केलेल्या संवादाचे प्रतिध्वनी मी ऐकले.
कमलताईंच्या कथा-कादंबऱ्यांमधले संगीताचे संदर्भ जणू सांगीतिक आविष्कार होऊन मला वेढून टाकत. खूप वर्षांपूर्वी मी नागपूरला असताना एक प्रदीर्घ आजारपण भोगलं होतं. त्या घनघोर अंधारातून बाहेर येताना, त्यांच्या काही पात्रांभोवती आभा मला खुणावत असे. ही आभाच त्यांच्या खोलीतल्या प्रकाशाकडे नेणारी ठरली.
निर्मिती, शोध आणि खेळ या तीनही प्रेरणा त्यांच्या लेखनात एकवटल्या आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातही निर्माता, लहान मूल आणि तत्त्वज्ञ हे पैलू एकत्रित होते. साध्या लौकिक गोष्टींबद्दल बोलता बोलता एकदम तत्त्वज्ञानाकडे झेपावत, साध्या खेळाचे वैश्विक खेळात रूपांतर करणे याचा प्रत्यय त्यांच्या लेखनात येतो. त्यांची प्रतिभा काळाचे अगदी सहजपणे खेळणे करते.
त्यांची कथा-कादंबरी तुलनेनं पुढच्या काळाची होती असं म्हणणं अर्धसत्य ठरेल कारण कालजयी होण्याचं सामार्थ्य त्यात आहे. विस्कटलेल्या कुटुंबाचं चित्रण करणाऱ्या त्यांच्या कुटुंबकथा अंतिमतः विस्कटलेल्या विश्वाच्या पसाऱ्याचं लघुरूप उभं करतात. प्रस्थापित मूल्यव्यवस्थेची चौकट खिळखिळी होईल, इतके मूलगामी प्रश्न त्या उपस्थित करतात. त्यांची जीवनदृष्टी मानवी अस्तित्वासह साऱ्या सृष्टीला गवसणी घालणारी आहे.
कुठल्याही वयाच्या माणसाशी मैत्री होणं हे कमलताईंचं खास वैशिष्ट्यं होतं. स्वतःकडचं भरभरून देतानाच दुसऱ्याकडे काही वेगळं आहे असं जाणवलं तर ते मागे लागून त्याच्याकडून समजून घेणं हा त्यांचा ध्यास असे. मी 'गांधी' चित्रपटावर लिहिलेला एक लेख 'मला तुझ्या संगतीत पुन्हा एकदा 'गांधी' बघायचा आहे', असं त्या वारंवार म्हणायच्या.
अगदी अलीकडे आम्ही गेल्या मे महिन्यात कमलताईंच्या साहित्याची एक अभ्यासक डॉ. प्रिया जामकर हिच्याकडे दोन-तीन दिवस एकत्र राहिलो. 'रंग' या कथेवर चित्रपट करावा असं प्रिया आणि हृषिकेश या दोघांचंही स्वप्न आहे. याबद्दलच्या चर्चेत, अगदी खेळात सामील होत असल्यासारख्या त्या सहभागी झाल्या आणि एका क्षणी म्हणाल्या, 'बाकी सगळं ठरलं असेल तर तुमच्या सिनेमात मी काय करणार, ते मी सांगते. मी या सिनेमाला संगीत देणार.' त्यांची ही घोषणा 'हॅट घालणाऱ्या बाई'मधील नायिकेला शोभणारी होती. मी नेहमी गंमतीनं त्यांना म्हणायचो, 'ब्याऐंशीव्या वर्षी चित्रपटात काम करायला तुम्ही सुरुवात केली, आता शंभरीपर्यंत पुढची अठरा वर्षांची देदीप्यमान चित्रपट-कारकीर्द तुमच्यापुढे आहे. मेमध्येच त्यांचा आणखी एकदा अचानक फोन आला. त्या म्हणाल्या, 'काही नाही, खूप दिवसात तुझा आवाज ऐकला नाही म्हणून खरं तर फोन केलाय. आणखी एक- मला दोन नव्या गोष्टी सुचल्यात. माझ्या लक्षात राहतील न राहतील, लिहिणं होईल न होईल.'
आणि नंतर आता अगदी अलीकडचा जूनमधला एक दिवस. 'कमलताईंना सांगलीत 'आयसीयू'त ठेवलंय' असं सांगणारा प्रियाचा फोन आला. आम्ही तिकडे जाण्यासाठी तयारी करतो तोच त्यांची प्रकृती आठवडाभरात स्थिरावेल असं सांगणारा निरोप सांगलीहून मिळाला. आणि लगेच १६ जूनला उशिरा रात्री त्या गंभीर असल्याचं कळलं. १७ जूनला सकाळी सांगलीच्या वाटेवर निघालो असताना कमलताई 'गेल्याचा' निरोप मिळाला. आम्ही निघालो होतोच. त्यांचं अंत्यदर्शनही होणार नाही हेही स्पष्ट होतं; पण मीच मनातल्या मनात प्रार्थना करत होतो की त्यांचं अंत्यदर्शन मला घडू नये. ते ऊर्जा-केंद्र माझ्या मनात सळसळत- दृश्य रूपात तसंच राहावं असं मला वाटत होतं.
मी रात्री दहाच्या सुमारास सांगलीला पोहोचलो. त्यांच्या कुटुंबीयांना भेटलो. पण मला सारखी खुणावत होती ती त्यांची खोली. मी आणि मृदुल कमलताईंचे भाचे दिलीप देसाई आणि शिरीष जोशी यांच्यासह कमलताईंच्या खोलीत गेलो. माझ्या मनात दाटल्या होत्या आठवणी - २००३ साली मी प्रथम त्यांना भेटलो तेव्हाच्या. माझ्यासमोर एका कंदिलाकडे बघून, 'अरे, तू इथं कसा? असं कंदिलाशी बोलणाऱ्या कमलताई मी इथेच पाहिल्या होत्या. सत्यशोधाच्या वाटेवर साऱ्या सृष्टीशी जोडून घेणारे कमल देसाई नावाचे चैतन्य मी सदेह रूपात इथंच प्रथम अनुभवले होते.
...मी वाकून खोलीलाच नमस्कार केला. मला दिसत  होत्या त्या आरामखुर्चीत बसलेल्या आणि मला सांगतायेत, 'माझी परमेश्वराची कल्पना वेगळी आहे. मी खरं तर धर्मबिर्म न मानणारी बाई आहे. तोकसा आहे, तो माझ्याजवळच आहे. म्हणजे माझ्या खोलीभर आनंद आहे. माझ्याकडून जाणाऱ्या माणसाला मी म्हणते, 'खोली भरून आनंद घेऊन जा.'
कमलताई, तुम्ही हे सांगितलं तेव्हापासून मी अनेक गोष्टी तुमच्या 'खोली'च्या प्रकाशातच बघतो आहे!
गांधी गेले तेव्हा विनोबा म्हणाले होते, 'बापू देहात होते तोपर्यंत त्यांना भेटण्यासाठी जाण्याला काहीतरी वेळ लागत असे. पण आतातर त्यांना भेटायला एका क्षणाचाही वेळ लागत नाही. डोळे बंद केले की भेट झालीच.'
माझ्यासाठीही तुमचं 'असणं' तसंच आहे. डोळे बंद केले की तुमची भेट.
एकदा माझ्या संगतीनं तुम्हाला 'गांधी' चित्रपट बघायचा होता.
फक्त तेवढ्यासाठी फिरून यालं कमलताई? तेव्हा मात्र माझे डोळे उघडे असतील, सतत झरणारे...

एक चैतन्यमयी परिक्रमा

कमल देसाईंची संजय आर्वीकर यांनी घेतलेली एक मुलाखत 'पद्मगंधा'च्या २०११ सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती, त्या मुलाखतीमधला हा अंश आहे. आर्वीकरांनी त्यांच्या 'फेसबुक' खात्यावरून ९ नोव्हेंबर २०२१ रोजी हा अंश प्रसिद्ध केला. त्यांची परवानगी घेऊन तो अंश इथे चिकटवतो आहे. शीर्षक दिवाळी अंकातल्या मूळ मुलाखतीचंच ठेवलं आहे.

संजय आर्वीकरः मागे आपण बोललो तेव्हा तुम्ही वडिलांच्या तुमच्यावर पडलेल्या प्रभावाबद्दल बोलला होता. तुमच्या प्रागतिक,सुधारणावादी विचारांमागे,खुलेपणामागे त्यांचा प्रभाव,त्यांच्याकडून नकळत शिकणं ,आत्मसात करणं असं आहे का?

कमल देसाईः तसंच आहे ते... लहानपणापासून त्यांचा एक प्रभाव माझ्यावर होता की कधीही कुणामध्येही भेदभाव करायचा नाही. दुसरी गोष्ट अशी की जात-पातच मानायची नाही.त्यामुळे झालं काय की आम्ही कुणातही मिसळत होतो.आमच्यावर कसलं,कुणाचंही बंधन नव्हतं.

ते असायचे तेव्हा मी सारखी त्यांच्या मागे मागे असायची. मला सारखं वाटायचं या माणसाइतकं थोर कुणी नाही आणि यांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. हे लहानपणी झालं. आम्ही चिकोडीला असताना ते पोस्ट-मास्टर होते.त्यांची काम करण्याची पद्धत फार चांगली होती.आपल्या हाताखालच्या लोकांशी ते फार प्रेमानं वागत.घरातल्या कुणावरही अन्याय होऊ नये,सगळ्या भावंडांना सारखं मिळावं,याकरता आमचे सगळ्यांचे कपडे सारखे असायचे.म्हणजे याच्यात मुलगा –मुलगी असा भेद नव्हता.कापड एक आणायचं आणि ते सगळ्यांना वाटून द्यायचं.यातून तुमचे कपडे शिऊन घ्या तुम्ही,असं ते सांगायचे अन् याच्यात सख्खी भावंडं,चुलत भावंड,मामे भावंड सगळे यायचे.मामासुद्धा यायचे.

संजयः म्हणजे सगळ्यांचं कर्तेपण त्यांच्याकडे होतं-

कमलताईः हो.कर्तेपण त्यांच्याकडे होतं आणि आपलं सगळं काम आपण करायचं हेही त्यांच्याकडून आम्ही शिकलो ...पुष्कळ दिवस आम्हाला दुसर्‍यांनी आपलं ताट घासलेलं आवडायचं नाही. आपण ते स्वतः स्वच्छ करायचं आणि जागच्या जागी ठेवायचं. राहिलेली खरकटी भांडी सगळ्यांनी मिळून घासायची आणि असंही नाही की पुरूषांनी काम करायचं नाही.पाणी भरणं हे पुरूषांकडे असायचं. पुरूष आणि स्त्री असा भेद त्यांच्याकडे नव्हता. माझ्या भावंडांना जसं शिकवलं तसंच आम्हा मुलींनाही.

आणखीन एक त्यांच्यात होतं. एखादी गोष्ट त्यांनी करायला घेतली की इतकी करायची की त्याच्यात लीडरशीप ते मिळवायचे किंवा आपोआपच त्यांच्याकडे ती चालत यायची.

एके काळी आम्हीसुद्धा चहा प्यायलेलो त्यांना आवडायचं नाही बरं का, खरं म्हणजे आम्ही चहा चोरून प्यायचो पण नंतर हॉटेलचा धंदा-उद्योग म्हणून सुरू केला. उत्कृष्टपणानं त्यांनी तो चालवला.स्वतः उत्कृष्ट चहा करायला लागले... हा उद्योग त्यांनी मिरजेत केला.त्यावेळी त्यांनी आपण सगळे मिळून एक असोसिएशन स्थापन करू, असा विचार मांडला...समोरच्या हॉटेलवाल्याकडंचं दूध संपलं तर आपल्याकडचं दूध दादा- माझे वडील नेऊन देत आणि आपल्याकडंचं संपलं तर तोही आणून द्यायचा.

संजयः तुझी प्रतिकूल परिस्थिती म्हणजे माझ्यासाठी संधी,असं कधी-

कमलताईः असं कधीही झालं नाही. धंद्यातला हा उमदेपणा- प्रामाणिकपणा-तरल-न्यायबुद्धीनं वागणं या गोष्टी मला अतिशय मोठ्या वाटतात....

संजयः तुम्ही सांगता आहात त्या सगळयात नैतिकतेचा धागा दिसतोय आणि तुम्ही स्वतः मागच्या वेळी आपण बोललो त्यावेळी म्हणाल्या होत्या ‘माणसानं नैतिक असावं,स्वतःशी प्रामाणिक असावं आणि ही नैतिकता मला माझ्या जीवनात घडोघडी शोधावी लागली.’ आता वडिलांबद्दल तुम्ही जे सांगितलं त्या सगळ्यातून नकळतपणे तुमच्यामध्ये हे स्पिरीट झिरपलं आहे,एक प्रकारे दिसतं. कसा होता तो प्रवास प्रत्यक्ष जीवनातच नैतिकता-मूल्य शोधण्याचा? ...यू आर नोन् अ‍ॅज फायटर थ्रू-आऊट द लाईफ. कशा प्रकारचा तो झगडा होता?

कमलताईः शाळा-कॉलेजमध्ये असताना आमच्यावर जरा अन्यायच झाला होत आहे असं वाटलं तर मी तो सहन करायचे नाही.तो दादांनीही कधी सहन केला नव्हता.त्यांचे साहेब जरी असं करत असले तरी ते सहन नाही करायचे.नोकरी सोडून द्यायचे.

तसं शाळेत आपल्यावर अन्याय करत आहोत असं कधी वाटलं तर कधी कधी मी बाजूला व्हायचे,कधी कधी भांडण करायचे पण अन्याय सहन नाही करायची. म्हणून मलाही नोकर्‍या सोडाव्या लागल्या. अन्याय होतो तर नेमका कुठे होतो आहे,का होत आहे,याचा विचार करणं माझं नैतिक मूल्यच आहे आणि ते मी शाळेत शिकत असताना, कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यापासून तर अगदी नोकरी करत असेपर्यंत पाळलं.नैतिकतेची वैशिष्टयं काय असली पाहिजे तर ती नेहमी बदलती असली पाहिजे.

संजयः म्हणजे स्थिर-स्टॅटिक नाही.

कमलताईः हो.नैतिकता मूल्य काळाशी जमवून घेणारं –सुसंगत असलं पाहिजे(काळानं जमवून घ्यायचं की मूल्यानं जमवून घयायचं ते ठरवा.) पण काळाच्या बरोबर पावलं टाकायची असतील-म्हणजे कसा जातो आहे हा काळ नेमका, कुठे प्रगतीकडे चालला आहे,आधुनिकतेकडे चालला आहे, काही नवा विचार देत आहे का...तिथं तिथं नव्या विचारांचं स्वागत करण्याकरता आपली नैतिकता आणि मूल्य बदलावी लागतात.

संजयः म्हणजे कालसुसंगतता-अनुरूपता याबरोबरच नव्या काळाच स्वागत करणं हा भागपण त्याच्यामध्ये आहे.

कमलताईः अगदी.

संजयः –आणि तुमचा झगडा?

कमलताईः झगडा असतोच आणि तो असलाच पाहिजे पण झगडा करताना आपण आपल्याशी प्रामाणिक राहिलो,आपण आपल्याशी निष्ठेने वागलो आणि तसं आपलं व्यक्तित्व पारदर्शक ठेवलं.हे बघायला लागतं.झगड्यात हे महत्वाचं.

संजयः हे असं स्वतःशी प्रामाणिक असणं,निष्ठेनं वागणं,यातून बाहेरच्या झगड्यासाठी बळ मिळतं असं वाटतं का?

कमलताईः असं पुष्कळ असतं...असंच असतं.स्वतःशी प्रामाणिक असलं आणि स्वतः पारदर्शक असलं तर खरोखरंच तुम्हाला बाहेरच्या जगाशी ताठपणानं उभं राहून भांडता येईल आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे- मी धर्म मानत नाही पण अशी शक्ती कुठेतरी आहे, त्या शक्तीला ‘देव’ जरी म्हटलं तर त्या ‘देवा’वर माझी लहानपणापासून श्रद्धा आहे आणि ही शक्तीच आपल्या पाठीमागे असते,बाकी कुणी नाही आणि आपण जर नीट मार्गाने जाणारे असलो तर ‘देव’ आपलं वाईट करणार नाही- ही श्रद्धा मला सतत उपयोगी पडली.

संजयः थोडं तुमच्या कथांकडे वळू या. मागच्या वेळी तुम्ही मलात तुमच्या पहिल्या कथेबद्दल सांगितलं होतं,पण आपण कथाकार आहोत,असा प्रत्यय देणारी तुमची पहिली कथा कोणती,असं वाटतं?

कमलताईः खरं सांगू,मला आपण कथाकार-म्हणजे लेखक या नात्यानं कथाकार आहोत,असा कधी वाटलंच नाही.

संजयः कधीतरी.सुरूवातीच्या काळानंतर-

कमलताईः नाही.मला वेगळं म्हणायचंय.मी लेखक होणं-किंवा लेखन हा माझा प्रांत आहे,असं मला कधी वाटलं नाही.याचा अर्थ असा नव्हे की मला कथा या वाङमय प्रकाराबद्दल आकर्षण नाही. त्या वाङमय प्रकाराबद्दल आकर्षण आहेच.किंबहुना कथा ऐकणं किंवा कोणी कथा सांगायला लागलं तर तिथं मी आधी जाऊन बसायची.म्हणजे मी पुराणं आधी तशी ऐकली,पहिल्यांदा आणि वाचल्यावर मला ती आणखी आवडली...

मला स्वतःला कथा सांगायला आवडतं.ती सारखी घडवणं,ते मला आवडतं.याचा अर्थ असा नव्हे की,ती मला लिहायला आवडते.लिहिणं मला फार आकर्षक वाटत नाही.

संजयः तरीपण लिहून झाल्यानंतर एक सफलतेचा क्षण माणसाच्या अनुभवाला येतो आणि त्याक्षणी तुम्हाला वाटतं,की मला हे जमलेलं आहे...म्हणजे तुम्ही म्हणता, त्याच्याशी मी सहमत आहे पण ‘हे मला जमलेलं आहे’ एवढी तरी भावना कधी एखाद्या कथेबद्दल मनात निर्माण झाली असेल.

कमलताईः कठीण आहे मला सांगणं हे. म्हणजे हा प्रश्न मला छान वाटला तरी पण-

संजयः माझा प्रश्न एवढाच आहे की पहिल्यांदा असं केव्हा वाटलं? मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होता की,कुठल्याही माध्यमाशी खेळणं कलावंताला आवडतं.

कमलताईः हं. पण खेळणं लिहायलाच पाहिजे असं काही मला वाटत नाही.

संजयः पण खेळत असताना कुठेतरी हा ‘खेळ’ जमला आपल्याला असं सांगणारा क्षण आपल्याही अनुभवाला येतो,म्हणजे ते दुसर्‍यानी सांगण्याची गरज नसते.

कमलताईः मी खरं सांगू का, मी जेव्हा लिहिते,कथा,कादंबरी किंवा काय जे लिहिते,तेव्हा माझं मन जरा असमाधानीच असतं.काहीतरी राहून गेलं,अशी भावना मनात राहणं ही मला यशाची पहिली पायरी वाटते.

संजयः तुमचं अशा दृष्टीनं सतत असमाधानी असणं किंवा अपुरेपण वाटणं स्वतःच्या आविष्काराबद्दल...कदाचित म्हणूनच तुमच्या प्रत्येक कथेमध्ये तुम्ही काहीतरी वेगळं साधत असता.एक कथा लिहिली आणि ते साधलं की दुसर्‍या पद्धतीनं काहीतरी ‘एक्स्प्लोअर’ करणं, असं दिसतं. कुठलीही एक कथा दुसर्‍या कथेसारखी नाही.याचं कारण कदाचित हे अपुरेपण वाटणं आणि या अपुरेपणापाशीच नव्या कथेचा उगम असावा. देअर इज बिगिनिंग इन एव्हरी सिमिंग एन्ड. प्रत्येक भासणार्‍या अंतापाशी एक नवा उगम.तुमच्या सततच्या अस्वस्थपणाशी हे जोडलेलं असावं.

कमलताईः हं.

संजयः सौंदर्यशास्त्र,तत्वज्ञान यांचा तुम्ही ध्यासानं,कसोशीनं अभ्यास केला एका अर्थाने रा.भा.पाटणकर यांच्यासारख्यांसह केलेला तो बौद्धिक सहप्रवास होता. ही ‘क्वेस्ट’ कशा स्वरूपाची होती? तो अनुभव कसा होता?

कमलताईः खरं म्हणजे आम्ही दोघंही, मी आणि पाटणकर,दोघंही पुस्तकं वाचून चर्चा करत होतो.चर्चा करण्यातून आम्हाला एकमेकांचे प्रश्न जास्त उलगडत जात आणि ते उलगडत जाण्यातून आम्ही आणखी आणखी त्या प्रश्नांच्या मागे लागायचो.असं पाटणकरांचंही व्हायचं आणि माझंही व्हायचं.परंतु माझी मी स्वतंत्र करायची. त्यांचं ते स्वतंत्र करायचे. त्यावेळी आम्ही एकमेकांच्या मध्ये यायचो नाही.परंतु अतिशय गंभीरपणे आम्ही ते सगळं करायचो. तो एक अत्यंत गांभीर्यानं केलेला-सतत काहीतरी शोधण्याचा,ध्यास असलेला प्रयत्न होता आणि तो आम्ही दोघांनी मिळून केला,याची आम्हाला अपूर्वाई होती.परंतु काही काळानंतर आम्हाला शीण यायचा.असं करणं थोडंसं कठीण असतं बरं.

पण शीण आल्यानंतर आम्ही चहा प्यायला बसायचो आणि आम्ही हसायचो.गप्पा मारायचो आणि काहीही...काहीही बडबडायचो. त्यात काहीही अर्थ नसायचा.बडबडून खूप हसायचो. ते आम्हाला आमच्या सतत चालणार्‍या अभ्यासावरचं औषध वाटायचं. आम्ही दोघेही लहान मुलांसारखे हसायचो.

संजयः जरा शीण घालवणारं असेल ते.

कमलताईः हो, एका परीनं.अभ्यास करताना तोही तितक्याच गांभीर्यानं आणि सखोलतेनं केलेला....

संजयः –पण हे मला फार लक्षणीय वाटतं की या सहप्रवासातही तुमचा तुमचा प्रवास तेवढ्याच जोमानं सुरू असायचा.

कमलताईः हो.त्यामुळेच मी वर्गात शिकवलेलं आणि त्यांनी वर्गात शिकवलेलं याच्यामध्ये फरक असायचा. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की आम्ही ‘थिअरी’ वेगळी घेत होतो. ‘थिअरी’ एकच पण ती शिकवण्याची आमची पद्धत वेगळी असायची.

संजयः आणि तरीही तो एकमेकांना पूरक असा सहप्रवास,परस्परांना समृद्ध करणारा असायचा.

कमलताईः हो.पेपर वाचताना ते कळायचं.

संजयः –आणि त्याच्यामध्ये ‘सॅल्युटिंग इच अदर’. दोघांनाही एकमेकांकडून मिळालं त्यासाठी,असंही असायचं.

कमलताईः हं. ‘सॅल्युटिंग इच अदर’!

संजयः सॅल्युटिंग इच अदर अँड आल्सो जॉंईंट क्वेस्ट टू अटेन् ट्रूथ...

कमलताईः ‘ट्रूथ’बद्दल मला वाटतं...

संजयः जीवनाबद्दलचं सत्य!

कमलताईः –आणि दुसरं आम्हाला वाटत होतं, की आम्हाला आमच्यासाठी फिलॉसॉफी मिळयला पाहिजे.ते कांट-बिंट नको आम्हाला.

संजयः म्हणजे ‘रेडिमेड’ तत्वज्ञान नको होतं. आमच्या आयुष्यासाठी आम्हाला पूरक तत्वज्ञान मिळालं पाहिजे,अशी ‘क्वेस्ट’-

कमलताईः - आणि म्हणूनच त्यांचं त्यांचं ते करायचे आणि माझं माझं मी करायची.कधी कधी आम्ही एकमेकांना सांगायचो.एक मार्ग असला तरी वेगवेगळ्या अंगानं केलेली ती ‘क्वेस्ट’ होती.मी माझ्या अंगानं आणि त्यांनी त्यांच्या अंगानं.

संजयः अलीकडे बरेचदा मला असं जाणवतं,की दोघेजण बोलत असतात आणि दुसरा माणूस फक्त ‘रिसिव्हर’- ग्रहणकर्ता असतो.तुम्ही सांगता. मी ऐकतो.दोघांमध्ये त्यावेळी एक ‘सॅक्रेड सायलेन्स’-पवित्र शांतता असते.तुम्ही सांगता त्यासाठी मी फक्त निमित्तमात्र ठरलेलो असतो.तरीही ते दोघांसाठीही नितांत सुंदर...मन भरून टाकणारं असतं.

तुम्हाला सापडलेलं जीवन-सत्य तुम्ही सांगत असता. एक सॅक्रेड सायलेन्स ग्रहणकर्ता अनुभवत असतो. ते (रा.भा.पाटणकर) सांगत असताना तुम्ही ‘रिसिव्हर’ असता. तुम्ही सांगत असताना ते ‘रिसिव्हर’ असतात.त्यामुळे दोघांचंही बौद्धिक-मानसिक जीवन खूप समृद्ध झालेलं असतं.

कमलताईः हो. आणि तरीही ते नातं ‘रेसिप्रोकल’ असतं.

संजयः कमलताई,मागच्या वेळी आपण कलाकृती साकारताना किंवा इमॅजिनेशनमध्ये असणार्‍या ‘सेन्स ऑफ डिस्कव्हरी’ बद्दल आपण बरंच बोललो होतो. तुम्ही त्यावेळी असंही बोलला होता की, ‘सेन्स ऑफ डिस्कव्हरी’ कागदावर उतरली म्हणजेच ती असते असं नाही. पण असे अनुभव तुम्हाला आले असतील की जे कागदावर उतरलेले नाही पण तुमच्या दृष्टीनं त्यांनी तुम्हाला ‘सेन्स ऑफ डिस्कव्हरी’ दिला. त्याच्यातला एक मुद्दा माझ्याशी तुम्ही विस्तारानं बोलला होता. ‘टाईम अँड स्पेसबद्दल’, पण इतरही बाबतीतही तुम्हाला असा सेन्स ऑफ डिस्कव्हरी’ दिला असेल. –तर अशा अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल?...

कमलताईः विचार करून सांगते मी. दिलाय. पुष्कळ गोष्टींनी असा अनुभव दिलाय. पुष्कळ तपशील देऊ शकेन मी.पण थोडा आणखी विचार करून बोलू आपण याबद्दल. कारण हा प्रश्न मोठ्ठा आणि गंभीर आहे आणि ज्या गांभीर्याने तो विचारला आहे ते लक्षात घेता, आपण थोडं नंतर बोलू.

संजयः मागच्या वेळी आणखी एक गोष्ट तुम्ही मला सांगितली होती. कुठल्याही माध्यमाशी खेळणं कलावंताला आवडतं. माध्यमाचं आणि कलावंताचं जे नातं असतं ते सजीवत्वाचं असतं आणि तुम्ही विशिष्ट शब्द वापरून ते सूचित केलं होतं. दोन सजींवांमधला ‘शक्तिनिविष्ट’ संवाद आहे तो,असं तुम्ही म्हणाला होता. हे थोडं अधिक उलगडून दाखवाल तर मला खूप आवडेल.

कमलताईः हा ‘शक्तिनिविष्ट’ जो शब्द आहे तो द.ग.गोडसे यांचा. तसंच रससिद्धांतामध्येसुद्धा तो आहे. भरतानं ती अंतर्भूत असलेली शक्ती आहे, असं सुद्धा मानलं.म्हणजे नाटक सुरू झाल्यानंतर ते उमलत जातं.नाटक सुरू होण्याआधी,पडदा उघडतो तेव्हा, ती अशी- उमलू पाहण्या उत्सुक- अशा अवस्थेत आत असते. नाटक,नट आणि समोरचा श्रोतृवृंद यांचा संवाद सुरू होईल- असं मी मुद्दाम म्हणते. श्रोतृवृंद हा कधीही नुसता ऐकत नाही. श्रोतृवृंद नुसता रिसिव्हर नसतो,तर तो त्याच्यात भाग घेत असतो. त्यांचा संवाद सुरू झाला की मग ते खरं उलगडायला लागतं आणि मग ते खरं उत्फुल्ल होतं.अशा प्रकारचा जो खेळ असतो, तो उभयपक्षी असतो. तो लेखक नाटककार-नट-दिग्दर्शक आणि श्रोतृवृंद या सगळ्यांमधला. एक मिळून झालेला असा संघटित संवाद असतो आणि संघटित संवादात तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळून जातात.त्या किती मिळाल्या, हे आपल्याला खूप उशीरा कळतं. बघितलं की सगळंच कळलं नाटक,असं कधीही नसतं...

संजयः –आणि कुठल्यातरी अनुभवातून पुन्हा ते आठवतं. ‘कनेक्ट’ होतं किंवा दुसरंच काहीतरी बघत असताना ते क्षण पुन्हा जागे होतात.

कमलताईः म्हणजे शक्तिनिविष्ट संवादामध्ये माध्यमं जिवंत असतात, असं मी का म्हणते-जेव्हा माध्यम म्हणून एखाद्या कलावंताच्या हाती एखादी रेषा येते,एखादा सूर येतो, तेव्हा, तो अत्यंत सजीव आणि शक्तिनिविष्ट असतो आणि ही शक्ती ती अंतर्भूत असते- अंतर्गत स्वरूपाची असते.

माध्यमं जिवंत असतात याबद्दल बर्नार्ड बोझंकिटसुद्धा सांगतो; पण त्याबद्दल जास्त भरत बोलतो.मला भरताचं म्हणणं जास्त वैशिष्ट्यपूर्ण वाटतं कारण माध्यमामुळं तिथं असलेली शक्ती, जी सुप्त असते ती प्रगट होते,असं त्यानी म्हटलं आहे.

आविष्कार सुरू झाला की उमलत...उमलत...उमलत... उमलत ते पूर्ण उमलतं, असा त्याचा अर्थ आहे.पण लेखक म्हणून तू मला विचारलं की हे कसं घडतं, तर मी ते केव्हाही सांगू शकणार नाही....

संजयः अनुभव घेण्याविषयीचा माझा आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही बोरडम् किंवा कंटाळा येणं याबद्दल मागच्या वेळी बोलला होता.ते सगळं तुम्ही अनुभवाशी जोडलं होतं.तुम्ही असंही म्हणाला होता की एखादी छोटी मुलगी ,मला कंटाळा आला असं म्हणते तेव्हा ‘तुम्ही’ एकदम ‘ती छोटी मुलगी’ होता. तुम्हाला वाटतं मीच ती आहे. तुम्हीपण एक असा अनुभव लहानपणी घेतला आहे.

लेखक-कलावंत म्हणून मी तुम्हाला विचारतो की ज्या वेळेस तुम्ही प्रत्यक्ष लिहीत असता किंवा कलाकृती साकारण्याबद्दल विचार करत असता, तेव्हा काही काळापुरती का होईना- त्या काळाच्या चौकटीतून- आपली सुटका झाली असा काही अनुभव येतो का?

कमलताईः बोरडम् हा संपूर्ण जीवनाच्या मिळालेल्या अनुभवाचा एक मर्यादित भाग आहे. बोरडम् हे या जीवनाचं सत्य आहे.सत्य म्हणण्यापेक्षा जीवनाचं ज्ञान आहे,असं म्हटलं तर त्या मर्यादित ज्ञानातच आपण अडकतो का?

खरं म्हणजे तू हा जो मूळ प्रश्न विचारलेला आहे की कलाकृती साकारताना बोरडममधून कलावंताची काही काळापुरती,सुटका होते का? हा अतिशय तत्वज्ञानात्मक प्रश्न आहे. आपण जन्माला येतो ते मुळी काही बंधनांसह आणि आपण अवकाश बघताना कालनिबद्ध असतो.स्थलकालनिबद्ध असल्यानं निसर्गाचे नियम आपल्याला लागू आहेत आणि आपल्याला मात्र वाटतं की स्वतंत्र असावं.

आपण स्वतंत्र आहोत या जाणिवेनं आपण काम करत असतो आणि एखाद्या दिवशी आपल्या लक्षात येतं की आपण अनेक कामं करत असताना आपल्याला कंटाळा आला आहे. कामं करतो हे सुद्धा कंटाळ्याचं स्वरूप आहे की काय? याचा अर्थ कंटाळा असणं हा स्थायीभाव आहे, हे लक्षात येणं आणि त्याला शरण जाणं, त्या पारतंत्र्यात राहणं सहन करणं शक्य होत नाही म्हणून अनेक व्यवहार आणि कामं आपण करतो. कंटाळ्यातून सुटका नाही हे पहिल्यांदा जेव्हा कळतं,तेव्हा भयभीत करणारं असतं ... ते काम्यूचं पुस्तक आहे ना?

संजयः दि मिथ ऑफ सिसिफस-

कमलताईः ते आठवतं .सारखं दगडाचं गडगडत खाली येणं-

संजयः –आणि दुसर्‍या टोकाला सॅम्युअल बेकेटचा ‘बेलाक्वा’ म्हणजे मूर्तिमंत कंटाळा.

कमलताईः मूर्तिमंत कंटाळा हेच खरं रूप आहे जीवनाचं. आपण म्हणतो आम्ही काम करतो. आम्हाला येत नाही कंटाळा आणि गती वाढवतो आपण. म्हणजे काय करतो आपण? त्यातून सुटका पाहिजे म्हणून गती वाढवतो.

संजयः नाही. निर्मिती करण्याचा जो क्षण आहे तो बोरडम् ला छेद देत नाही का? असा माझा प्रश्न आहे.

कमलताईः देतो का?

संजयः मला वाटतं देतो. बोरडममधून तात्पुरती का होईना,तुमची सुटका होते.तुम्ही निर्माण करत असता त्या क्षणी तुम्हाला बोरडमचा अनुभव नाही येत.

कमलताईः म्हणजे निर्मिती तू श्रेष्ठ मानतोस आणि बोरडम्-

संजयः श्रेष्ठ-कनिष्ठतेपेक्षा ‘इट कान्ट गो हँड इन् हँड’...असं-

कमलताईः या...या... ‘इट कान्ट गो हँड इन् हँड’. दॅटस् ट्रू.

संजयः ज्या क्षणी तुम्ही निर्माण करता त्या क्षणी तुम्ही निश्चितपणे बोरडमवर मात केली असते.ज्या क्षणी तुम्ही आपल्या निर्मितीबद्दल विचार करत असता,एक प्रकारे ‘डिस्कव्हरी’चा अनुभव घेत असता...म्हणजे माणसाची बोरडमवर मात करण्याची क्षमता ही त्याच्या निर्मितीप्रेरणेशी जोडलेली आहे.

कमलताईः हो.असं म्हणायला हरकत नाही. आता हे तुझ्या लक्षात येतं का बघ.ज्यावेळी आपण मुलाखतीचं काम करतो,हे सुद्धा तू लक्षात ठेव, की आपण दोघं मिळून अशा वेळी काहीतरी निर्माण करत असतो.आता तू हे निर्माण केलंस.माझ्यातला विचार पुढं नेला. ... मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा हे दोघं मिळून काम करत असतात आणि तू नुसतंच ऐकत नसतो माझं, तर तुझंही मन विचार करत असतं आणि विचार करता करता काहीतरी त्याला जोडत असतो. आणि त्यातूनच तू हे निर्माण केलंस आणि मला सांगितलंस की बोरडमवर मात करून आपण-

संजयः निर्मितीचा क्षण साकारत असतो. ‘साक्षात’ करत असतो.

कमलताईः –आणि ते साक्षात करणं म्हणजे कागदावर उतरवणं नव्हे आणि तिथंच एक डिस्कव्हरीचा सेन्स येतो आणि हाती लागलं आहे ते किती मोलाचं आहे, असंही वाटतं आणि बोरडममधून सुटका झाली आहे,असंही... 

Tuesday, November 1, 2011

कमल देसाईंची कामगिरी

- रेखा इनामदार-साने

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) मराठी विभागाने जानेवारी २०००मध्ये 'गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी' या विषयावर चर्चासत्र घेतले होते. या चर्चासत्रात वाचल्या गेलेल्या 'गेल्या अर्धशतकातील स्त्री-कादंबरीकारांची कामगिरी' या निबंधाचा कमलताईंसंबंधीचा भाग इथे दिला आहे. इनामदार-साने यांचा मूळ पूर्ण निबंध 'गेल्या अर्धशतकातील मराठी कादंबरी' या विलास खोले यांनी संपादित केलेल्या नि 'लोकवाङ्मय गृहा'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकात वाचायला मिळेल. पुस्तक ऑगस्ट २००२मध्ये प्रकाशित झालंय.

'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' (१९६४) आणि 'काळा सूर्य व हॅट घालणारी बाई' (१९७५) असे अत्यंत मोजके लेखन कमल देसाईंनी केलेले आहे. अतिभौतिकीय, सनातन स्वरूपाच्या प्रश्नांचे भान, अमूर्त तत्त्वचिंतनात्मक वृत्ती, नेणिवेतील धूसरता, अनुभवातील व्यामिश्रता व संज्ञाप्रवाही शैली या साऱ्या विशेषांमुळे कमल देसाई यांचे कादंबरीविश्व अजोड वाटते. कथानकात सुसूत्रता, कार्यकारणभाव, कालानुक्रम न पाळता (वर्तमान -भूत-वर्तमान किंवा वर्तमान-भविष्य-वर्तमान असे प्रवास त्यांच्या व्यक्तिरेखा लीलया करतात). केवळ अनुभवप्रामाण्य मानणे, प्रतिमा-प्रतीके यांची व पौर्वात्य-पाश्चिमात्य साहित्यकृतीतील संदर्भांची योजना आणि ऐंद्रिय संवेदनांचे मिश्रण यामुळे या कादंबऱ्या आकलनसुलभ राहत नाहीत, त्या दुर्बोध वाटतात. ''आपण तिथं कां गेलो होतो? परत कां आलो? कसला हेतू आहे त्याच्या मुळाशी?.. अर्थ काय रे या साऱ्याचा?... ही माती, ही खुर्ची, हा तू, ही मी - कसली संगती आहे यात? कसला हेतू असेल यात? का काहीच नाही? कशाचा अर्थच कशाला लागत नाही. एकाकी, हास्यास्पद वाटतं, असंच असतं का रे जीवन?'' कितीही. खूप व केवढाही खोल विचार केला तरी जीवनाचे समग्र स्वरूप अनाकलनीय व अतर्क्य राहते. इंटरेस्टिंग व अम्युझिंग असे जीवनाचे रूप दाखवताना लेखिका तिच्या विक्षिप्त भासेल अशा विनोदबुद्धीने चाकोरीबद्ध जीवनरीतीचा कसा उपहास करते ते पाहण्यासारखे आहे. ''थोड्या स्थूल, तृप्त, गोड चेहऱ्याच्या, केवड्याची कांती जपणाऱ्या वहिनी फार समंजस. मिळतंजुळतं घेणाऱ्या. व्यवहार-वेळ ओळखणाऱ्या, ओळखून वागणाऱ्या. त्या स्त्री-किर्लोस्कर नियमित वाचायच्या. त्यावरूनच त्यांना समजलं - आधुनिक स्त्रीपुढं खूप समस्या आहेत. याला उपाय काय? आपलं आपणच सोडवलं पाहिजे. प्रथम आपल्याला काय हवं ते ओळखायचं! वहिनींनी तसं ओळखलं... माणसानं तडजोड करावी. नऊवारी नेसून सडा घालावा. (सुलोचना नेहमी सिनेमात घालते तसा!) आणि सर्वांना चहा करून द्यावा मग आपण घ्यावा. असं केल्यानं काय होतं? संसार सुखाचा होतो. (रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, पृष्ठं ६१-६२). अशा सुबक, नेटक्या संसाराच्या घडणीत गबाळग्रंथी, छांदिष्ट 'कविता करून मोठं होण्याची' आस लागलेल्या, हळव्या, मधूच्या कुटुंबाभोवती पाकोळीसारख्या भिरभिरणाऱ्या सुशीलेला काही स्थानच नाही. पुढे तर तिला वाळीत टाकले जाते पण 'आयुष्य किती कठीण आणि अशक्य, किती मूढ करणारं आणि या दोन्ही अनुभवांना पचवण्याची शक्ती असली तर केवढं मनोरंजक' आहे ते जाणण्या-पाहण्यात तिचा जीव रमलेला आहे.
'काळा सूर्य'मधील विरंची या ओसाडनगरीत राहणाऱ्या नायिकेला 'जड, आळसटलेले' उथळ, लिबलिबित प्रेम तिरस्करणीय, नकोनकोसे वाटते. तिला प्रस्थापित मूल्यव्यवस्थेचे दडपण झुगारून देणाऱ्या अश्वरथासारखे 'स्वच्छ व करकचून' जगायचे आहे. अंतःकरण यातनांनी पिळवटून निघाल्याविना अस्तित्वाची तीक्ष्ण खूण कशी पटणार, त्यामुळे पापाच्या खाईत ती रसरसून उडी घेते. ईश्वराशी भांडण मांडते. नीच, अधम बेंद्रेचे तिला आकर्षण वाटते. पण अखेरीस उरते ती 'एकटेपणाची जाणीव पुरेपूर भोगण्याची इच्छा.' 'हॅट'मधील नायिकेचा स्मृतिभंश झाल्याने आपोआपच काळ व अवकाश या दोन तत्त्वांशी मुक्तपणे खेळणे लेखिकेला शक्य झाले आहे. भूतकालाचा सांधा येथे निखळलेला असल्याने स्मृतींवर आधारलेली अनुभवाची सलगताही प्रत्ययास येत नाही. त्यामुळे 'मी अत्ता या क्षणी तुमच्याशी का बोलत असावं दुसरीकडं का नसावं' हा प्रश्न इथे तिला व तिच्यापेक्षा अधिक भोवतालच्या लोकांना सतावतो. अस्तित्ववादी व अतिवास्तववादी जाणिवांची इतकी कलात्मक व परिणामकारक अभिव्यक्ती या एकाच लेखिकेला साधलेली आहे. (आतापर्यंत तिला कोणी वारसदार लाभलेला नाही.) या तऱ्हेचा संवेदनस्वभाव आणि परिणतप्रज्ञ व्यक्तिमत्त्व अपवादानेचे आढळते. यामुळे कमल देसाईंची कामगिरी मराठी कादंबरीच्या परंपरेत उठून-उमटून दिसणारी आहे.