कमल देसाईंची संजय आर्वीकर यांनी घेतलेली एक मुलाखत 'पद्मगंधा'च्या २०११ सालच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती, त्या मुलाखतीमधला हा अंश आहे. आर्वीकरांनी त्यांच्या 'फेसबुक' खात्यावरून ९ नोव्हेंबर २०२१ रोजी हा अंश प्रसिद्ध केला. त्यांची परवानगी घेऊन तो अंश इथे चिकटवतो आहे. शीर्षक दिवाळी अंकातल्या मूळ मुलाखतीचंच ठेवलं आहे.
संजय आर्वीकरः मागे आपण बोललो तेव्हा तुम्ही वडिलांच्या तुमच्यावर पडलेल्या प्रभावाबद्दल बोलला होता. तुमच्या प्रागतिक,सुधारणावादी विचारांमागे,खुलेपणामागे त्यांचा प्रभाव,त्यांच्याकडून नकळत शिकणं ,आत्मसात करणं असं आहे का?
कमल देसाईः तसंच आहे ते... लहानपणापासून त्यांचा एक प्रभाव माझ्यावर होता की कधीही कुणामध्येही भेदभाव करायचा नाही. दुसरी गोष्ट अशी की जात-पातच मानायची नाही.त्यामुळे झालं काय की आम्ही कुणातही मिसळत होतो.आमच्यावर कसलं,कुणाचंही बंधन नव्हतं.
ते असायचे तेव्हा मी सारखी त्यांच्या मागे मागे असायची. मला सारखं वाटायचं या माणसाइतकं थोर कुणी नाही आणि यांनी आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. हे लहानपणी झालं. आम्ही चिकोडीला असताना ते पोस्ट-मास्टर होते.त्यांची काम करण्याची पद्धत फार चांगली होती.आपल्या हाताखालच्या लोकांशी ते फार प्रेमानं वागत.घरातल्या कुणावरही अन्याय होऊ नये,सगळ्या भावंडांना सारखं मिळावं,याकरता आमचे सगळ्यांचे कपडे सारखे असायचे.म्हणजे याच्यात मुलगा –मुलगी असा भेद नव्हता.कापड एक आणायचं आणि ते सगळ्यांना वाटून द्यायचं.यातून तुमचे कपडे शिऊन घ्या तुम्ही,असं ते सांगायचे अन् याच्यात सख्खी भावंडं,चुलत भावंड,मामे भावंड सगळे यायचे.मामासुद्धा यायचे.
संजयः म्हणजे सगळ्यांचं कर्तेपण त्यांच्याकडे होतं-
कमलताईः हो.कर्तेपण त्यांच्याकडे होतं आणि आपलं सगळं काम आपण करायचं हेही त्यांच्याकडून आम्ही शिकलो ...पुष्कळ दिवस आम्हाला दुसर्यांनी आपलं ताट घासलेलं आवडायचं नाही. आपण ते स्वतः स्वच्छ करायचं आणि जागच्या जागी ठेवायचं. राहिलेली खरकटी भांडी सगळ्यांनी मिळून घासायची आणि असंही नाही की पुरूषांनी काम करायचं नाही.पाणी भरणं हे पुरूषांकडे असायचं. पुरूष आणि स्त्री असा भेद त्यांच्याकडे नव्हता. माझ्या भावंडांना जसं शिकवलं तसंच आम्हा मुलींनाही.
आणखीन एक त्यांच्यात होतं. एखादी गोष्ट त्यांनी करायला घेतली की इतकी करायची की त्याच्यात लीडरशीप ते मिळवायचे किंवा आपोआपच त्यांच्याकडे ती चालत यायची.
एके काळी आम्हीसुद्धा चहा प्यायलेलो त्यांना आवडायचं नाही बरं का, खरं म्हणजे आम्ही चहा चोरून प्यायचो पण नंतर हॉटेलचा धंदा-उद्योग म्हणून सुरू केला. उत्कृष्टपणानं त्यांनी तो चालवला.स्वतः उत्कृष्ट चहा करायला लागले... हा उद्योग त्यांनी मिरजेत केला.त्यावेळी त्यांनी आपण सगळे मिळून एक असोसिएशन स्थापन करू, असा विचार मांडला...समोरच्या हॉटेलवाल्याकडंचं दूध संपलं तर आपल्याकडचं दूध दादा- माझे वडील नेऊन देत आणि आपल्याकडंचं संपलं तर तोही आणून द्यायचा.
संजयः तुझी प्रतिकूल परिस्थिती म्हणजे माझ्यासाठी संधी,असं कधी-
कमलताईः असं कधीही झालं नाही. धंद्यातला हा उमदेपणा- प्रामाणिकपणा-तरल-न्यायबुद्धीनं वागणं या गोष्टी मला अतिशय मोठ्या वाटतात....
संजयः तुम्ही सांगता आहात त्या सगळयात नैतिकतेचा धागा दिसतोय आणि तुम्ही स्वतः मागच्या वेळी आपण बोललो त्यावेळी म्हणाल्या होत्या ‘माणसानं नैतिक असावं,स्वतःशी प्रामाणिक असावं आणि ही नैतिकता मला माझ्या जीवनात घडोघडी शोधावी लागली.’ आता वडिलांबद्दल तुम्ही जे सांगितलं त्या सगळ्यातून नकळतपणे तुमच्यामध्ये हे स्पिरीट झिरपलं आहे,एक प्रकारे दिसतं. कसा होता तो प्रवास प्रत्यक्ष जीवनातच नैतिकता-मूल्य शोधण्याचा? ...यू आर नोन् अॅज फायटर थ्रू-आऊट द लाईफ. कशा प्रकारचा तो झगडा होता?
कमलताईः शाळा-कॉलेजमध्ये असताना आमच्यावर जरा अन्यायच झाला होत आहे असं वाटलं तर मी तो सहन करायचे नाही.तो दादांनीही कधी सहन केला नव्हता.त्यांचे साहेब जरी असं करत असले तरी ते सहन नाही करायचे.नोकरी सोडून द्यायचे.
तसं शाळेत आपल्यावर अन्याय करत आहोत असं कधी वाटलं तर कधी कधी मी बाजूला व्हायचे,कधी कधी भांडण करायचे पण अन्याय सहन नाही करायची. म्हणून मलाही नोकर्या सोडाव्या लागल्या. अन्याय होतो तर नेमका कुठे होतो आहे,का होत आहे,याचा विचार करणं माझं नैतिक मूल्यच आहे आणि ते मी शाळेत शिकत असताना, कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यापासून तर अगदी नोकरी करत असेपर्यंत पाळलं.नैतिकतेची वैशिष्टयं काय असली पाहिजे तर ती नेहमी बदलती असली पाहिजे.
संजयः म्हणजे स्थिर-स्टॅटिक नाही.
कमलताईः हो.नैतिकता मूल्य काळाशी जमवून घेणारं –सुसंगत असलं पाहिजे(काळानं जमवून घ्यायचं की मूल्यानं जमवून घयायचं ते ठरवा.) पण काळाच्या बरोबर पावलं टाकायची असतील-म्हणजे कसा जातो आहे हा काळ नेमका, कुठे प्रगतीकडे चालला आहे,आधुनिकतेकडे चालला आहे, काही नवा विचार देत आहे का...तिथं तिथं नव्या विचारांचं स्वागत करण्याकरता आपली नैतिकता आणि मूल्य बदलावी लागतात.
संजयः म्हणजे कालसुसंगतता-अनुरूपता याबरोबरच नव्या काळाच स्वागत करणं हा भागपण त्याच्यामध्ये आहे.
कमलताईः अगदी.
संजयः –आणि तुमचा झगडा?
कमलताईः झगडा असतोच आणि तो असलाच पाहिजे पण झगडा करताना आपण आपल्याशी प्रामाणिक राहिलो,आपण आपल्याशी निष्ठेने वागलो आणि तसं आपलं व्यक्तित्व पारदर्शक ठेवलं.हे बघायला लागतं.झगड्यात हे महत्वाचं.
संजयः हे असं स्वतःशी प्रामाणिक असणं,निष्ठेनं वागणं,यातून बाहेरच्या झगड्यासाठी बळ मिळतं असं वाटतं का?
कमलताईः असं पुष्कळ असतं...असंच असतं.स्वतःशी प्रामाणिक असलं आणि स्वतः पारदर्शक असलं तर खरोखरंच तुम्हाला बाहेरच्या जगाशी ताठपणानं उभं राहून भांडता येईल आणि दुसरी गोष्ट मला सांगायची आहे- मी धर्म मानत नाही पण अशी शक्ती कुठेतरी आहे, त्या शक्तीला ‘देव’ जरी म्हटलं तर त्या ‘देवा’वर माझी लहानपणापासून श्रद्धा आहे आणि ही शक्तीच आपल्या पाठीमागे असते,बाकी कुणी नाही आणि आपण जर नीट मार्गाने जाणारे असलो तर ‘देव’ आपलं वाईट करणार नाही- ही श्रद्धा मला सतत उपयोगी पडली.
संजयः थोडं तुमच्या कथांकडे वळू या. मागच्या वेळी तुम्ही मलात तुमच्या पहिल्या कथेबद्दल सांगितलं होतं,पण आपण कथाकार आहोत,असा प्रत्यय देणारी तुमची पहिली कथा कोणती,असं वाटतं?
कमलताईः खरं सांगू,मला आपण कथाकार-म्हणजे लेखक या नात्यानं कथाकार आहोत,असा कधी वाटलंच नाही.
संजयः कधीतरी.सुरूवातीच्या काळानंतर-
कमलताईः नाही.मला वेगळं म्हणायचंय.मी लेखक होणं-किंवा लेखन हा माझा प्रांत आहे,असं मला कधी वाटलं नाही.याचा अर्थ असा नव्हे की मला कथा या वाङमय प्रकाराबद्दल आकर्षण नाही. त्या वाङमय प्रकाराबद्दल आकर्षण आहेच.किंबहुना कथा ऐकणं किंवा कोणी कथा सांगायला लागलं तर तिथं मी आधी जाऊन बसायची.म्हणजे मी पुराणं आधी तशी ऐकली,पहिल्यांदा आणि वाचल्यावर मला ती आणखी आवडली...
मला स्वतःला कथा सांगायला आवडतं.ती सारखी घडवणं,ते मला आवडतं.याचा अर्थ असा नव्हे की,ती मला लिहायला आवडते.लिहिणं मला फार आकर्षक वाटत नाही.
संजयः तरीपण लिहून झाल्यानंतर एक सफलतेचा क्षण माणसाच्या अनुभवाला येतो आणि त्याक्षणी तुम्हाला वाटतं,की मला हे जमलेलं आहे...म्हणजे तुम्ही म्हणता, त्याच्याशी मी सहमत आहे पण ‘हे मला जमलेलं आहे’ एवढी तरी भावना कधी एखाद्या कथेबद्दल मनात निर्माण झाली असेल.
कमलताईः कठीण आहे मला सांगणं हे. म्हणजे हा प्रश्न मला छान वाटला तरी पण-
संजयः माझा प्रश्न एवढाच आहे की पहिल्यांदा असं केव्हा वाटलं? मागच्या वेळी तुम्ही म्हणाला होता की,कुठल्याही माध्यमाशी खेळणं कलावंताला आवडतं.
कमलताईः हं. पण खेळणं लिहायलाच पाहिजे असं काही मला वाटत नाही.
संजयः पण खेळत असताना कुठेतरी हा ‘खेळ’ जमला आपल्याला असं सांगणारा क्षण आपल्याही अनुभवाला येतो,म्हणजे ते दुसर्यानी सांगण्याची गरज नसते.
कमलताईः मी खरं सांगू का, मी जेव्हा लिहिते,कथा,कादंबरी किंवा काय जे लिहिते,तेव्हा माझं मन जरा असमाधानीच असतं.काहीतरी राहून गेलं,अशी भावना मनात राहणं ही मला यशाची पहिली पायरी वाटते.
संजयः तुमचं अशा दृष्टीनं सतत असमाधानी असणं किंवा अपुरेपण वाटणं स्वतःच्या आविष्काराबद्दल...कदाचित म्हणूनच तुमच्या प्रत्येक कथेमध्ये तुम्ही काहीतरी वेगळं साधत असता.एक कथा लिहिली आणि ते साधलं की दुसर्या पद्धतीनं काहीतरी ‘एक्स्प्लोअर’ करणं, असं दिसतं. कुठलीही एक कथा दुसर्या कथेसारखी नाही.याचं कारण कदाचित हे अपुरेपण वाटणं आणि या अपुरेपणापाशीच नव्या कथेचा उगम असावा. देअर इज बिगिनिंग इन एव्हरी सिमिंग एन्ड. प्रत्येक भासणार्या अंतापाशी एक नवा उगम.तुमच्या सततच्या अस्वस्थपणाशी हे जोडलेलं असावं.
कमलताईः हं.
संजयः सौंदर्यशास्त्र,तत्वज्ञान यांचा तुम्ही ध्यासानं,कसोशीनं अभ्यास केला एका अर्थाने रा.भा.पाटणकर यांच्यासारख्यांसह केलेला तो बौद्धिक सहप्रवास होता. ही ‘क्वेस्ट’ कशा स्वरूपाची होती? तो अनुभव कसा होता?
कमलताईः खरं म्हणजे आम्ही दोघंही, मी आणि पाटणकर,दोघंही पुस्तकं वाचून चर्चा करत होतो.चर्चा करण्यातून आम्हाला एकमेकांचे प्रश्न जास्त उलगडत जात आणि ते उलगडत जाण्यातून आम्ही आणखी आणखी त्या प्रश्नांच्या मागे लागायचो.असं पाटणकरांचंही व्हायचं आणि माझंही व्हायचं.परंतु माझी मी स्वतंत्र करायची. त्यांचं ते स्वतंत्र करायचे. त्यावेळी आम्ही एकमेकांच्या मध्ये यायचो नाही.परंतु अतिशय गंभीरपणे आम्ही ते सगळं करायचो. तो एक अत्यंत गांभीर्यानं केलेला-सतत काहीतरी शोधण्याचा,ध्यास असलेला प्रयत्न होता आणि तो आम्ही दोघांनी मिळून केला,याची आम्हाला अपूर्वाई होती.परंतु काही काळानंतर आम्हाला शीण यायचा.असं करणं थोडंसं कठीण असतं बरं.
पण शीण आल्यानंतर आम्ही चहा प्यायला बसायचो आणि आम्ही हसायचो.गप्पा मारायचो आणि काहीही...काहीही बडबडायचो. त्यात काहीही अर्थ नसायचा.बडबडून खूप हसायचो. ते आम्हाला आमच्या सतत चालणार्या अभ्यासावरचं औषध वाटायचं. आम्ही दोघेही लहान मुलांसारखे हसायचो.
संजयः जरा शीण घालवणारं असेल ते.
कमलताईः हो, एका परीनं.अभ्यास करताना तोही तितक्याच गांभीर्यानं आणि सखोलतेनं केलेला....
संजयः –पण हे मला फार लक्षणीय वाटतं की या सहप्रवासातही तुमचा तुमचा प्रवास तेवढ्याच जोमानं सुरू असायचा.
कमलताईः हो.त्यामुळेच मी वर्गात शिकवलेलं आणि त्यांनी वर्गात शिकवलेलं याच्यामध्ये फरक असायचा. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की आम्ही ‘थिअरी’ वेगळी घेत होतो. ‘थिअरी’ एकच पण ती शिकवण्याची आमची पद्धत वेगळी असायची.
संजयः आणि तरीही तो एकमेकांना पूरक असा सहप्रवास,परस्परांना समृद्ध करणारा असायचा.
कमलताईः हो.पेपर वाचताना ते कळायचं.
संजयः –आणि त्याच्यामध्ये ‘सॅल्युटिंग इच अदर’. दोघांनाही एकमेकांकडून मिळालं त्यासाठी,असंही असायचं.
कमलताईः हं. ‘सॅल्युटिंग इच अदर’!
संजयः सॅल्युटिंग इच अदर अँड आल्सो जॉंईंट क्वेस्ट टू अटेन् ट्रूथ...
कमलताईः ‘ट्रूथ’बद्दल मला वाटतं...
संजयः जीवनाबद्दलचं सत्य!
कमलताईः –आणि दुसरं आम्हाला वाटत होतं, की आम्हाला आमच्यासाठी फिलॉसॉफी मिळयला पाहिजे.ते कांट-बिंट नको आम्हाला.
संजयः म्हणजे ‘रेडिमेड’ तत्वज्ञान नको होतं. आमच्या आयुष्यासाठी आम्हाला पूरक तत्वज्ञान मिळालं पाहिजे,अशी ‘क्वेस्ट’-
कमलताईः - आणि म्हणूनच त्यांचं त्यांचं ते करायचे आणि माझं माझं मी करायची.कधी कधी आम्ही एकमेकांना सांगायचो.एक मार्ग असला तरी वेगवेगळ्या अंगानं केलेली ती ‘क्वेस्ट’ होती.मी माझ्या अंगानं आणि त्यांनी त्यांच्या अंगानं.
संजयः अलीकडे बरेचदा मला असं जाणवतं,की दोघेजण बोलत असतात आणि दुसरा माणूस फक्त ‘रिसिव्हर’- ग्रहणकर्ता असतो.तुम्ही सांगता. मी ऐकतो.दोघांमध्ये त्यावेळी एक ‘सॅक्रेड सायलेन्स’-पवित्र शांतता असते.तुम्ही सांगता त्यासाठी मी फक्त निमित्तमात्र ठरलेलो असतो.तरीही ते दोघांसाठीही नितांत सुंदर...मन भरून टाकणारं असतं.
तुम्हाला सापडलेलं जीवन-सत्य तुम्ही सांगत असता. एक सॅक्रेड सायलेन्स ग्रहणकर्ता अनुभवत असतो. ते (रा.भा.पाटणकर) सांगत असताना तुम्ही ‘रिसिव्हर’ असता. तुम्ही सांगत असताना ते ‘रिसिव्हर’ असतात.त्यामुळे दोघांचंही बौद्धिक-मानसिक जीवन खूप समृद्ध झालेलं असतं.
कमलताईः हो. आणि तरीही ते नातं ‘रेसिप्रोकल’ असतं.
संजयः कमलताई,मागच्या वेळी आपण कलाकृती साकारताना किंवा इमॅजिनेशनमध्ये असणार्या ‘सेन्स ऑफ डिस्कव्हरी’ बद्दल आपण बरंच बोललो होतो. तुम्ही त्यावेळी असंही बोलला होता की, ‘सेन्स ऑफ डिस्कव्हरी’ कागदावर उतरली म्हणजेच ती असते असं नाही. पण असे अनुभव तुम्हाला आले असतील की जे कागदावर उतरलेले नाही पण तुमच्या दृष्टीनं त्यांनी तुम्हाला ‘सेन्स ऑफ डिस्कव्हरी’ दिला. त्याच्यातला एक मुद्दा माझ्याशी तुम्ही विस्तारानं बोलला होता. ‘टाईम अँड स्पेसबद्दल’, पण इतरही बाबतीतही तुम्हाला असा सेन्स ऑफ डिस्कव्हरी’ दिला असेल. –तर अशा अनुभवाबद्दल तुम्ही काय सांगाल?...
कमलताईः विचार करून सांगते मी. दिलाय. पुष्कळ गोष्टींनी असा अनुभव दिलाय. पुष्कळ तपशील देऊ शकेन मी.पण थोडा आणखी विचार करून बोलू आपण याबद्दल. कारण हा प्रश्न मोठ्ठा आणि गंभीर आहे आणि ज्या गांभीर्याने तो विचारला आहे ते लक्षात घेता, आपण थोडं नंतर बोलू.
संजयः मागच्या वेळी आणखी एक गोष्ट तुम्ही मला सांगितली होती. कुठल्याही माध्यमाशी खेळणं कलावंताला आवडतं. माध्यमाचं आणि कलावंताचं जे नातं असतं ते सजीवत्वाचं असतं आणि तुम्ही विशिष्ट शब्द वापरून ते सूचित केलं होतं. दोन सजींवांमधला ‘शक्तिनिविष्ट’ संवाद आहे तो,असं तुम्ही म्हणाला होता. हे थोडं अधिक उलगडून दाखवाल तर मला खूप आवडेल.
कमलताईः हा ‘शक्तिनिविष्ट’ जो शब्द आहे तो द.ग.गोडसे यांचा. तसंच रससिद्धांतामध्येसुद्धा तो आहे. भरतानं ती अंतर्भूत असलेली शक्ती आहे, असं सुद्धा मानलं.म्हणजे नाटक सुरू झाल्यानंतर ते उमलत जातं.नाटक सुरू होण्याआधी,पडदा उघडतो तेव्हा, ती अशी- उमलू पाहण्या उत्सुक- अशा अवस्थेत आत असते. नाटक,नट आणि समोरचा श्रोतृवृंद यांचा संवाद सुरू होईल- असं मी मुद्दाम म्हणते. श्रोतृवृंद हा कधीही नुसता ऐकत नाही. श्रोतृवृंद नुसता रिसिव्हर नसतो,तर तो त्याच्यात भाग घेत असतो. त्यांचा संवाद सुरू झाला की मग ते खरं उलगडायला लागतं आणि मग ते खरं उत्फुल्ल होतं.अशा प्रकारचा जो खेळ असतो, तो उभयपक्षी असतो. तो लेखक नाटककार-नट-दिग्दर्शक आणि श्रोतृवृंद या सगळ्यांमधला. एक मिळून झालेला असा संघटित संवाद असतो आणि संघटित संवादात तुम्हाला कितीतरी गोष्टी मिळून जातात.त्या किती मिळाल्या, हे आपल्याला खूप उशीरा कळतं. बघितलं की सगळंच कळलं नाटक,असं कधीही नसतं...
संजयः –आणि कुठल्यातरी अनुभवातून पुन्हा ते आठवतं. ‘कनेक्ट’ होतं किंवा दुसरंच काहीतरी बघत असताना ते क्षण पुन्हा जागे होतात.
कमलताईः म्हणजे शक्तिनिविष्ट संवादामध्ये माध्यमं जिवंत असतात, असं मी का म्हणते-जेव्हा माध्यम म्हणून एखाद्या कलावंताच्या हाती एखादी रेषा येते,एखादा सूर येतो, तेव्हा, तो अत्यंत सजीव आणि शक्तिनिविष्ट असतो आणि ही शक्ती ती अंतर्भूत असते- अंतर्गत स्वरूपाची असते.
माध्यमं जिवंत असतात याबद्दल बर्नार्ड बोझंकिटसुद्धा सांगतो; पण त्याबद्दल जास्त भरत बोलतो.मला भरताचं म्हणणं जास्त वैशिष्ट्यपूर्ण वाटतं कारण माध्यमामुळं तिथं असलेली शक्ती, जी सुप्त असते ती प्रगट होते,असं त्यानी म्हटलं आहे.
आविष्कार सुरू झाला की उमलत...उमलत...उमलत... उमलत ते पूर्ण उमलतं, असा त्याचा अर्थ आहे.पण लेखक म्हणून तू मला विचारलं की हे कसं घडतं, तर मी ते केव्हाही सांगू शकणार नाही....
संजयः अनुभव घेण्याविषयीचा माझा आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही बोरडम् किंवा कंटाळा येणं याबद्दल मागच्या वेळी बोलला होता.ते सगळं तुम्ही अनुभवाशी जोडलं होतं.तुम्ही असंही म्हणाला होता की एखादी छोटी मुलगी ,मला कंटाळा आला असं म्हणते तेव्हा ‘तुम्ही’ एकदम ‘ती छोटी मुलगी’ होता. तुम्हाला वाटतं मीच ती आहे. तुम्हीपण एक असा अनुभव लहानपणी घेतला आहे.
लेखक-कलावंत म्हणून मी तुम्हाला विचारतो की ज्या वेळेस तुम्ही प्रत्यक्ष लिहीत असता किंवा कलाकृती साकारण्याबद्दल विचार करत असता, तेव्हा काही काळापुरती का होईना- त्या काळाच्या चौकटीतून- आपली सुटका झाली असा काही अनुभव येतो का?
कमलताईः बोरडम् हा संपूर्ण जीवनाच्या मिळालेल्या अनुभवाचा एक मर्यादित भाग आहे. बोरडम् हे या जीवनाचं सत्य आहे.सत्य म्हणण्यापेक्षा जीवनाचं ज्ञान आहे,असं म्हटलं तर त्या मर्यादित ज्ञानातच आपण अडकतो का?
खरं म्हणजे तू हा जो मूळ प्रश्न विचारलेला आहे की कलाकृती साकारताना बोरडममधून कलावंताची काही काळापुरती,सुटका होते का? हा अतिशय तत्वज्ञानात्मक प्रश्न आहे. आपण जन्माला येतो ते मुळी काही बंधनांसह आणि आपण अवकाश बघताना कालनिबद्ध असतो.स्थलकालनिबद्ध असल्यानं निसर्गाचे नियम आपल्याला लागू आहेत आणि आपल्याला मात्र वाटतं की स्वतंत्र असावं.
आपण स्वतंत्र आहोत या जाणिवेनं आपण काम करत असतो आणि एखाद्या दिवशी आपल्या लक्षात येतं की आपण अनेक कामं करत असताना आपल्याला कंटाळा आला आहे. कामं करतो हे सुद्धा कंटाळ्याचं स्वरूप आहे की काय? याचा अर्थ कंटाळा असणं हा स्थायीभाव आहे, हे लक्षात येणं आणि त्याला शरण जाणं, त्या पारतंत्र्यात राहणं सहन करणं शक्य होत नाही म्हणून अनेक व्यवहार आणि कामं आपण करतो. कंटाळ्यातून सुटका नाही हे पहिल्यांदा जेव्हा कळतं,तेव्हा भयभीत करणारं असतं ... ते काम्यूचं पुस्तक आहे ना?
संजयः दि मिथ ऑफ सिसिफस-
कमलताईः ते आठवतं .सारखं दगडाचं गडगडत खाली येणं-
संजयः –आणि दुसर्या टोकाला सॅम्युअल बेकेटचा ‘बेलाक्वा’ म्हणजे मूर्तिमंत कंटाळा.
कमलताईः मूर्तिमंत कंटाळा हेच खरं रूप आहे जीवनाचं. आपण म्हणतो आम्ही काम करतो. आम्हाला येत नाही कंटाळा आणि गती वाढवतो आपण. म्हणजे काय करतो आपण? त्यातून सुटका पाहिजे म्हणून गती वाढवतो.
संजयः नाही. निर्मिती करण्याचा जो क्षण आहे तो बोरडम् ला छेद देत नाही का? असा माझा प्रश्न आहे.
कमलताईः देतो का?
संजयः मला वाटतं देतो. बोरडममधून तात्पुरती का होईना,तुमची सुटका होते.तुम्ही निर्माण करत असता त्या क्षणी तुम्हाला बोरडमचा अनुभव नाही येत.
कमलताईः म्हणजे निर्मिती तू श्रेष्ठ मानतोस आणि बोरडम्-
संजयः श्रेष्ठ-कनिष्ठतेपेक्षा ‘इट कान्ट गो हँड इन् हँड’...असं-
कमलताईः या...या... ‘इट कान्ट गो हँड इन् हँड’. दॅटस् ट्रू.
संजयः ज्या क्षणी तुम्ही निर्माण करता त्या क्षणी तुम्ही निश्चितपणे बोरडमवर मात केली असते.ज्या क्षणी तुम्ही आपल्या निर्मितीबद्दल विचार करत असता,एक प्रकारे ‘डिस्कव्हरी’चा अनुभव घेत असता...म्हणजे माणसाची बोरडमवर मात करण्याची क्षमता ही त्याच्या निर्मितीप्रेरणेशी जोडलेली आहे.
कमलताईः हो.असं म्हणायला हरकत नाही. आता हे तुझ्या लक्षात येतं का बघ.ज्यावेळी आपण मुलाखतीचं काम करतो,हे सुद्धा तू लक्षात ठेव, की आपण दोघं मिळून अशा वेळी काहीतरी निर्माण करत असतो.आता तू हे निर्माण केलंस.माझ्यातला विचार पुढं नेला. ... मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा हे दोघं मिळून काम करत असतात आणि तू नुसतंच ऐकत नसतो माझं, तर तुझंही मन विचार करत असतं आणि विचार करता करता काहीतरी त्याला जोडत असतो. आणि त्यातूनच तू हे निर्माण केलंस आणि मला सांगितलंस की बोरडमवर मात करून आपण-
संजयः निर्मितीचा क्षण साकारत असतो. ‘साक्षात’ करत असतो.
कमलताईः –आणि ते साक्षात करणं म्हणजे कागदावर उतरवणं नव्हे आणि तिथंच एक डिस्कव्हरीचा सेन्स येतो आणि हाती लागलं आहे ते किती मोलाचं आहे, असंही वाटतं आणि बोरडममधून सुटका झाली आहे,असंही...
No comments:
Post a Comment