कमल देसाई १७ जून २०११ रोजी गेल्या. तेव्हा 'ई-सकाळ'वर प्रसिद्ध झालेली ही बातमी. फक्त संदर्भासाठीच--
(निधनाच्या बातमीचा संदर्भच सुरुवातीला काहींना कदाचित पटणार नाही, पण काय करणार?)
(निधनाच्या बातमीचा संदर्भच सुरुवातीला काहींना कदाचित पटणार नाही, पण काय करणार?)
----------
प्रयोगशील लेखिका कमल देसाई यांचे निधन
सांगली- आपल्या प्रयोगशील लिखाणाने मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केलेल्या लेखिका कमल देसाई यांचे आज (शुक्रवारी) सकाळी नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. मेंदूज्वरामुळे त्या आजारी होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. साहित्य, चित्रकला, सांस्कृतिक क्षेत्रांतील नव्या पिढीशी त्यांचा सतत संवाद असे. त्यांचा सार्वजनिक वावर शेवटपर्यंत कायम होता. गेल्या गुरुवारी सांगलीत 'न्यू प्राईड मल्टीप्लेक्स'मध्ये त्यांनी मित्रांसोबत 'बालगंधर्व' चित्रपट पाहिला होता. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी गांधर्वयुगावर दिलखुलास चर्चा केली होती.
आज दुपारी साडेतीनच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार असल्याचे निकटवर्तियांनी सांगितले.
कमलताईंचा जन्म कर्नाटकातील यमकनमर्डी गावात १० नोव्हेंबर १९२८ रोजी झाला. प्राथमिक माध्यमिक शिक्षण धारवाडमध्ये झाले. इंग्रजी भाषा आणि साहित्यावरील अलोट प्रेम होते. तरीही त्यांनी मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून एमए केले. पदवीनंतर त्यांनी अहमदाबाद, धुळे, भिवंडी, मिरज, कागल येथे दीर्घ काळ मराठीचे अध्यापन केले. सौंदर्यशास्त्र आणि मराठी साहित्य हे त्यांचे आवडीचे विषय होते.
साठ-सत्तरच्या दशकांमध्ये 'सत्यकथा' मासिकामधून पुढे आलेल्या आधुनिक जाणिवेच्या लेखक-लेखिकांमध्ये कमल देसाईंची गणना होते. प्रतिके आणि प्रतिमांची अर्थवाही लेखनशैली त्यांचे वेगळेपण दाखवणारी ठरली.पॉप्युलर प्रकाशनाने कमलताईंचा 'रंग-१' हा कथासंग्रह १९६२ मध्ये प्रकाशित केला. या कथासंग्रहातील 'तिळा बंद' कथेने इतिहास निर्माण केला. आशिया खंडातील स्त्रीवादी साहित्यातून निवडलेली ही कथा अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलीनॉय इथे अभ्यासक्रमासाठी लावली. त्यानंतरच्या विविध नियतकालिकांतील त्यांच्या कथा 'रंग २' नावाने प्रसिध्द झाल्या. 'रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग' ही कादंबरी, 'काळा सूर्य' व 'हॅट घालणारी बाई' या दोन लघुकादंबऱ्या प्रसिध्द झाल्या. गेल्या वर्षी सुमित्रा भावे यांच्या 'एक कप च्या' या चित्रपटातही त्यांनी काम केले. वंदना शिवा यांच्या 'स्टोलन हार्वेस्ट' या ग्रंथाचे 'लुबाडलेले शेत' नावाने तर बर्नर्ड बोंझाकिट यांच्या 'थ्री लेक्चर्स ऑन ऍस्थेटिक्स' या पुस्तकाचा 'सौंदर्यशास्त्रावरील तीन व्याख्याने' या नावाने अनुवाद केला.
No comments:
Post a Comment